अकोलेत तहसीलसमोर श्रमिकांचे आंदोलन सुरू

विविध क्षेत्रांतील कामगारांचा समावेश
आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी आक्रमक मोर्चा ः अधिकाऱ्यांनी केली चर्चा

अकोले  – श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर किसान सभा, सिटू कामगार संघटना व डीवायएफआय युवक संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वन जमीन, घरकुल, पिण्याचे पाणी व बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो श्रमिक सहभागी झाले आहेत.

आंदोलनातील मागण्यांच्या समर्थनार्थ 27 जून रोजी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे सायंकाळी जाहीर करण्यात आले. ऐतिहासिक शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्त 1 जून रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात संघटनांच्या वतीने अनेक मागण्या केल्या होत्या. मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास 27 जूनपासून अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. मोर्चाला 27 दिवस पूर्ण होऊनही मागण्यांची अंमलबजावणी न केल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

अकोले, संगमनेर, कोपरगाव तालुक्‍यांतील बांधकाम कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांच्या हजारो फायली आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. फायलींची दखल घेऊन लाभार्थींना तातडीने लाभ द्यावा, रुंभोडी गावातील शेतकऱ्यांच्या हद्दीत वन विभागाने अतिक्रमण करून शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जागेत अतिक्रमणे केली आहेत.

वन खात्याच्या वतीने केलेली ही अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत. पंतप्रधान आवास योजनेतून वंचित राहिलेल्या सर्व वंचितांचा यादीत समावेश करावा, बेलापूर येथील आदिवासींचा अडविलेला रस्ता मोकळा करावा, हिवरगाव येथील ठाकरवाडीला पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, शांताराम वारे, संदीप शिंदे, भाऊपाटील मालुंजकर, सीताबाई गोपाळे, संजय पवार, नंदू गावंडे, मंदा मुंगसे, हरीश धोंगडे, बाळशीराम बर्डे, एकनाथ बर्डे, दिलीप हिंदोळे, बाळू मधे, वाळीबा मेंगाळ, नामदेव बांडे आदी कार्यकर्ते या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)