विखेंसाठी कामाला लागा : ना. पंकजा मुंडे

पाथर्डी – खा. प्रीतम मुंडे जशी माझी बहीण, तसा सुजय विखे भाऊ आहे. विजय हा सुजयचाच होईल असा शब्द मी विखेंना देते. माझी मान कधीही खाली झुकणार नाही, यासाठी एक दिलाने कामाला लागा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात नामदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. याप्रसंगी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, सुजय विखे, माजी आमदार गोविंद केंद्रे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, अर्जुन शिरसाट, मोहन पालवे, अनिल कराळे, दिनकर पालवे, अमोल गर्जे, राहुल कारखिले, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, प्रवीण राजगुरू, माणिक खेडकर, अनिल बोरुडे, गोकूळ दौंड, नंदू शेळके, सोमनाथ खेडकर, चंद्रकला खेडकर, विष्णू अकोलकर, सुनील ओहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे मुंडे म्हणाल्या की, पाथर्डीमध्ये विखे यांचा अर्ज भरण्यापूर्वी झालेली विराट सभा विजय सभा वाटते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी जनसागर लोटला आहे. दोन्ही कुटुंबांनी एका प्रवृत्तीच्या विरोधात नेहमीच संघर्ष केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस अडचण निर्माण करण्यासाठीच निर्माण झालेला पक्ष आहे. बीडमध्ये आम्हाला तर नगरमध्ये शिवाजी कर्डिले यांना अडचण निर्माण केली आहे. मात्र कर्डिले यांच्यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. नगरला विरोधी पक्षनेते आहेत, तर आमच्याकडे पक्ष विरोधी नेते आहेत, असे म्हणून नामदार मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला. धनंजय मुंडे यांचा पक्ष विरोधी नेते असा नामोल्लेख करत मुंडे म्हणाल्या, पक्ष विरोधी नेते राष्ट्रवादीत येण्यापूर्वी बीड जिल्ह्यात पाच आमदार होते, आता भाजपचे पाच आमदार आहेत. पक्ष संपवण्याचे काम यांनी केले. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशाला नावे ठेवतात मात्र स्वतःच्या वडिलांना प्रथम राष्ट्रवादीत पाठवले, त्यांचा पराभव करून तुम्ही मागच्या दाराने गेले हे आठवा.

उसतोडणी कामगारांसाठी आम्ही काय केले असे विचारता. तुम्हाला ऊसतोडणी कामगारांचे प्रश्‍न काय माहित. ऊस तोडणी कामगारांना दोन वेळेला मानधनात वाढ केली. ऊस तोडणी कामगारांच्या लवादावरील नेमणूक मला मंत्रिपदाचा पेक्षाही जास्त महत्त्वाची वाटते. ऊस तोडणी कामगारांच्या हातातील कोयता दूर करण्याचे काम मला करायचे आहे. तुम्ही कितीही विरोध केला तरी चांगले काम करत राहणार. आमचे वडील हयात नाहीत म्हणून, आम्ही निवडणुकीत उतरलो ते यांना घराणेशाही वाटते मात्र राष्ट्रवादीतील घराणेशाही त्यांना दिसत नाही. पवारांची किती दिवस चमचेगिरी करणार असा सवालही ना. मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या रक्षणासाठी खंबीरपणे नेतृत्व करत आहेत. त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी व देशाच्या विकासासाठी सुजय विखे सारख्या तरुण नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे रहा. बीड जिल्ह्यात डॉ. प्रीतम मुंडे तर, नगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे असे दोन डॉक्‍टर खासदार होणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न मिटणार आहे. विकास निधी देताना आपण पाथर्डी परळी असा मतभेद कधीही केलेला नाही. परळी सारखाच पाथर्डीच्या लोकांवर माझा अधिक विश्‍वास आहे असे मुंडे शेवटी म्हणाल्या.

यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, मी भाग्यशाली आहे, मला भाजपसारखा पक्ष मिळाला आणि पंकजा मुंडे यांच्यासारखी बहीण मिळाली. मी पंकजा मुंडे, राम शिंदे, मोनिका राजळे, शिवाजी कर्डीले आणि जिल्ह्यातील भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांवर विश्‍वास ठेवुनच भाजपात दाखल झालो आहे. राष्ट्रवादीच्या कपटी धोरणामुळे आज माझे आई-वडील माझ्या प्रचारात येऊ शकत नाहीत. हे दुर्दैव आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विखेंचे काय असा संभ्रम सुरु केला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत मी व माझे सर्व कार्यकर्ते आमदार मोनिका राजळे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहुत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी स्वागत, सुरेश बाबर यांनी सूत्रसंचलन तर, रामनाथ बंग यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)