शब्द आणि कविता जगताना…

आपल्या फ्लॅटची ती भव्य गॅलरी. त्या गॅलरीमधून दिसणारे ते निसर्गसौंदर्य, गॅलरीमधील त्या टेबलवर असलेली ती डायरी आणि सोबत गरमागरम वाफाळणारा कॉफीचा मग आणि या सगळ्या क्षणांना मनातल्या शब्दांमध्ये साठवून ठेवणारी मी. मला आठवतेयं अजूनही, तु नेहमी म्हणायचा की, “हे असे नजरेतले चित्र तुला शब्दांमध्ये हुबेहुब मांडायला कसे गं जमते?? दरवेळी तु लिहिलेले थेट माझ्या आणि सगळ्यांच्याचं मनाला भुरळं घालून जाते. खरंच किती सुंदर लिहितेसं गं तु. मग ती कविता असो किंवा लेख किंवा अजून काही तुझे लिखाणं वाचताना डोळ्यासमोरं एक चित्र उभे राहते. मनातले थेटं शब्दांमध्ये उतरवायलां खूप कमी जणांनाचं जमते गं, जसे की तुला जमते. खऱ्या अर्थाने तु ते शब्दं आणि कविता जगवतेसं.”

आणि मला आठवतेयं की, तुझ्या या बोलण्यावरं त्या दिवशी मी निरुत्तर होते. खरेतर मी त्या दिवशी तुला फक्त” थॅन्क्‍स “, एवढेचं बोलू शकले. कदाचित त्या वेळी मलाही नेमके कळले नव्हते की, “मी कवितेला जगवतेयं की कविता मला..”, पण कदाचित आज याचे उत्तर मला कळले आहे कदाचितं. आणि म्हणूनचं तो दिवस, परत यावा आणि तु पुन्हा मला तोच प्रश्‍न विचारावा असे सारखे वाटते. अर्थात ते शक्‍य नाही हे माहीत असले, तरी या वेड्या मनाची ही आशा, अशीचं असते.

खरेतरं याचे उत्तर ही तुचं देऊन गेलासं मला. हो तु दिलेसं, तुझ्या त्या माझ्या आयुष्यात असलेल्या रिकाम्या पोकळीने, अलवारंपणे तुझ्या गॅलरीमध्ये माझ्या सोबत नसलेल्या अस्तित्वाने हे उत्तर दिले. ज्या क्षणी तु अचानकपणे मला फोटो फ्रेममध्ये माझ्यासोबत नसलेल्या तुझी साक्ष दिलीस, मी एकटी असल्याची जाणीव करून दिलीस ना, अगदी त्या क्षणापासून मी खरेतरं हसायचे, खायचे जणू जगायचेही विसरले होते खरेतर, एकट्या या मनांत लाखो विचारं यायचे आणि याच काळात माझे ते विचार, माझे एकटेपण त्या डायरीने दूर केले. जगामध्ये जिवंत नसलेल्या तुला माझ्या डायरीने मात्र नेहमीचं जिवंत ठेवले.

तु म्हणायचा की, “मी शब्दांना, कवितेला जगवते म्हणून”, पण खरे सांगू का मला वाटते हे शब्दं आणि या कविता जगवतांत कुठल्याही कवी आणि लेखकाला खऱ्या अर्थाने. आणि म्हणूनचं कदाचित कवी किंवा लेखक आयुष्यामधे कधीचं एकटा नसतो, कारण ज्या प्रमाणे एखादा कवी किंवा लेखक शब्दांवर प्रेम करतो किंबहुना त्याहून जास्त “हे शब्दं”, प्रेम करतांत कवी आणि लेखकावरं. तुला माहिती आहे का, कदाचित तु शरीराने सोबत नसताना ही माझ्या कवितेच्या रूपाने नेहमीचं माझ्या सोबत असतोसं. माझा श्‍वास होऊन. माझी सावली होऊन. आणि म्हणूनचं कदाचित मला आता या शब्दांसाठी पुन्हा नव्याने जन्म घ्यायला आवडेलं. मला पुन्हा एकदा कवी व्हायलां आवडेल.

– ऋतुजा कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)