वाईत चोरट्यांचा धुमाकूळ

“नागेवाडी’चे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
वाई – वाईच्या आठवडी बाजारात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत दिवसभरात अकरा मोबाईलच्या चोऱ्या केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहे. यात नामवंत कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश असून सर्व मोबाईलची एकत्रित किंमत लाखाच्या घरात आहे. रात्री उशिरापर्यंत तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते. यात अनेक मान्यवर प्रतिष्ठीत नागरिकांचेही मोबाईल गेल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

वाईचा आठवडी बाजार दर सोमवारी भरत असतो. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारी तुरळक लोक खरेदीसाठी येत असतात. परंतु दुपारनंतर सर्वांची खरेदीसाठी एकच गर्दी होत असते. मोबाईल चोर या गर्दीचाच फायदा घेऊन वरच्या खिशात ठेवलेले महागड्या मोबाईलवर हात साफ करीत आहेत. या चोरांना वेसन घालणे राहिले बाजूलाच मात्र पोलीस रस्ता अरुंद आहे, खरेदीदारांना ऐसपैस रस्ता उपलब्ध होत नाहीत, अशा लंगड्या सबबी सांगून तक्रारदारांची बोळवण करीत आहेत. दर सोमवारी मोबाईलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असूनही पोलीस यंत्रणा अद्यापही सज्ज न झाल्याने सर्वजण आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

पारंपरिक सोमवारच्या आठवडा बाजारचे कार्यक्षेत्र आता चौपट झाले असून सर्वत्र फिरून बंदोबस्त करण्यासाठी दहा-बारा पोलीस ठेवणे गरजेचे असताना फक्त एक-दोन पोलीस ठेवले जातात. हे पोलीस एक दोन राऊंड मारून सावली धरून उभे राहिलेले दिसतात. यामुळे चोरट्यांना मोकळे रान मिळत असून चोरट्यांवर पोलिसांचा कुठलाही अंकुश राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

पाचगणी येथील लहू चव्हाण यांचा वाईच्या आठवडे बाजारात भाजी खरेदी करताना मोबाईल चोरला. ही बाब लगेच लक्षात आल्याने त्यांनी आरडा ओरडा करून नागरिकांच्या सहकार्याने चोरास पकडले होते. त्याला चोप देऊन वाई पोलीसांच्या ताब्यात दिले होते. परंतू त्याची सखोल चौकशी करून या मोबाईल चोरट्यांची पाळेमुळे न खोदता तो चोरटा अल्पवयीन असल्याची सबब पुढे करीत त्याला सोडण्यात आले. याबाबतही शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)