महिला विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा : रेपिनोचा दुहेरी धमाका अमेरिका उपांत्य फेरीत

पॅरिस – फ्रान्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे हे मोठे आव्हानच असते. अमेरिकन खेळाडूंनी त्यास यशस्वी सामोर जात 2-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला आणि महिलांच्या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या या विजयात मेगान रेपिनो हिने दोन गोल करीत महत्त्वाची कामगिरी केली. अमेरिकेला उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर खेळावे लागणार आहे.

उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत रेपिनो हिने पाचव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. या गोलच्या आधारे अमेरिकेने मध्यंतरापर्यंत आघाडी टिकविली होती. उत्तरार्धात पुन्हा रेपिनो हिने सामन्याच्या 65 व्या मिनिटाला गोल केला व संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 81 व्या मिनिटाला फ्रान्सच्या वेंडल रिनार्द हिने गोल करीत चुरस निर्माण केली. तथापि अमेरिकन खेळाडूंनी फ्रान्सच्या चाली रोखून धरल्या.

उपांत्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यात इंग्लंडने नॉर्वे संघाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. त्यांच्याकडून जिल स्कॉट हिने तिसऱ्याच मिनिटाला संघाचे खाते उघडले. 40 व्या मिनिटाला तिची सहकारी एलीन व्हाईट हिने संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सामन्याच्या 57 व्या मिनिटाला ल्युसी ब्रॉंझ हिने इंग्लंडचा तिसरा गोल केला व संघाची बळकट केली. ही आघाडी कायम ठेवीत त्यांनी हा सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)