पुणे – वरिष्ठ राज्यस्तरीय महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत पुणे शहर संघाने पुणे जिल्हा संघावर सहज मात करून सुवर्णपदक पटकाविले. पुणे शहर संघाने प्रथमच महिलांच्या वरिष्ठ विभागात विजेतेपद घेत ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी पुणे शहर संघाने सब ज्युनिअर व ज्युनिअर गटात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकविले होते.
सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत पुणे शहर संघाने सोलापूर, जळगांव, नवी मुंबई या तीनही संघांवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात पुणे संघाची पिचर कविता राठोड हिने कौतुकास्पद कामगिरी केली. त्यानंतर उपांत्यपूर्व लढतीत पुणे शहर संघाने नागपूर संघाचा 6-0 होमरनने पराभव केला. या सामन्यात पुणे शहर संघातील प्रीती कांबळे, मोनाली नातू, हर्षदा कासार, माधुरी लबडे, संजीवनी सुर्यवंशी व मोहिनी गरड यांनी प्रत्येकी एक होमरन केला व पुणे संघाचे पिचर कविता राठोड हिने 2 स्ट्राईक आऊट घेतले. त्यामुळे नागपूर संघास एकही होमरन करता आला नाही.
उपांत्य लढतीत पुणे शहर संघाने अमरावती संघावर 5-3 होमरननी विजय मिळवला. या सामन्यात पुणे शहर संघातील प्रीती कांबळे, मोनाली नातू, हर्षदा कासार, माधुरी लबडे व प्रतिक्षा मुरकुटे यांनी प्रत्येकी एक होमरन केला व पुणे संघाचे पिचर कविता राठोड हिने 3 स्ट्राईक आऊट घेतले. प्रतिस्पर्धी अमरावती संघातील मयूरी भुते, साक्षी शिंदे यांनी उल्लेखनीय झुंज दिली.
अंतिम सामन्यात पुणे शहर संघाने पुणे जिल्हा संघावर 8-2 होमरनने सहज विजय मिळवला. या सामन्यात पुणे शहर संघातील प्रीती कांबळे, मोनाली नातू, हर्षदा कासार, प्रतिक्षा मुरकुटे, आरती भालेराव, कविता राठोड, मोहिनी गरड व संजीवनी सुर्यवंशी यांनी प्रत्येकी एक होमरन केला. पुणे जिल्हा संघातील किरण नवगिरे व रेष्मा पुणेकर यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
पुणे शहर संघाची कविता राठोड हिने स्पर्धेमध्ये एकूण तब्बल 13 स्ट्राइक आऊट घेतले त्यामुळे तिला उत्कृष्ट पिचर सन्मानित करण्यात आले तर पुणे जिल्हा संघातील किरण नवगीरे संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमेव एक होमर मारल्याने तिला उत्कृष्ट हिटर तर यांच संघातील हजरा शेख हिला उत्कृष्ट कॅचर म्हणून सन्मानित करण्यात आले. पुणे शहर संघास अतुल शिंदे, प्रज्वल जाधव व उत्कर्ष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.