महिला एकेरीत ईशा जोशी विजेती; जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे:अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत द्वितीय मानांकित सलोनी शाहचा कडवा प्रतिकार सात गेममध्ये मोडून काढताना अग्रमानांकित ईशा जोशीने येथे सुरू असलेल्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत विजेतेपदाचा मान मिळविला.

अखेरच्या गेमपर्यंत रंगतदार ठरलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत ईशा जोशीने सलोनी शाहची झुंज 9-11, 11-7, 11-8, 9-11, 11-6, 11-13, 11-9 अशी संपुष्टात आणताना ईशा जोशीने विजेतेपदाची निश्‍चिती केली. सलोनानी चौथ्या आणि सहाव्या गेमअखेर बरोबरी साधून ईशाला जोरदार लढत दिली. परंतु सातवी गेम अनुभवाच्या जोरावर जिंकून ईशाने बाजी मारली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत ईशाने शुभदा चांदोरकरचा 11-7, 11-6, 11-9, 11-6 असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. तर उपान्त्य लढतीत चतुर्थ मानांकित श्रुती गभाणेचा प्रतिकार 11-7, 11-13, 11-7, 11-4, 11-6 असा संपुष्टात आणताना ईशाने अंतिम फेरीत धडक मराली होती. सलोनीने उपान्त्यपूर्व फेरीत पृथिका सेनगुप्ताला 11-9, 9-11, 11-8, 11-7, 10-12, 11-4 असे पराभूत करीत अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. तर दुसऱ्या उपान्त्य सामन्यात स्वप्नाली नरळेची प्रखर झुंज 11-9, 7-11, 6-11, 11-4, 9-11, 12-10, 11-5 अशा विजयासह मोडून काढताना सलोनीने अंतिम फेरीत धडक मारली होती.

अनेय-अर्चन जोडीला दुहेरीत विजेतेपद

सबज्युनियर दुहेरीच्या अंतिम लढतीत अनेय कोवेलामुडी व अर्चन आपटे या अग्रमानांकित जोडीने नील मुळ्ये व अनीहा डिसूझा या बिगरमानांकित जोडीचे आव्हान 11-6, 11-8, 11-6 असे संपुष्टात आणताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. नील मुळ्ये व अनीहा डिसूझा या जोडीने उपान्त्य लढतीत पृथा वर्टीकर व आदित्य जोरी या द्वितीय मानांकित जोडीवर 11-9, 11-8, 11-7 अशी सनसनाटी मात केली होती. परंतु अंतिम लढतीत त्यांनी अग्रमानांकित जोडीविरुद्ध शरणागती पत्करली. तसेच रोहित चौधरी व देविका भिडे या अग्रमानांकित जोडीने आदर्श गोपाल व ईशा जोशी या आठव्या मानांकित जोडीचा 11-7, 11-3, 11-3, 6-11, 11-8 असा पराभव करताना खुल्या मिश्र दुहेरीत विजेतेपद संपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)