निवडणुकीत निर्णायक ठरणार “महिला शक्ती’

मतदारांचा टक्का वाढला : 1 हजार पुरुषांमागे 911 महिला

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात चार टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.

2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

सन 2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. सन 2014मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते. मात्र सन 2019मध्ये या प्रमाणात 1 हजार पुरुषांमागे 911 महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.

2014मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 8 कोटी 7 लाख 98 हजार 823 मतदारांनी नोंदणी केली. यामध्ये 2 कोटी 66 लाख 22 हजार 180 पुरुष मतदार होते. तर 2 कोटी 20 लाख 46 हजार 720 महिला मतदार होते. आता 2019मध्ये 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष मतदार आहेत. तर 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)