कलंदर: महिला दिन …

उत्तम पिंगळे

मी : नमस्कार विसरभोळे सर. झाला का महिला दिन?
विसरभोळे : हो हो झाला ना पण एकदम महिला दिना वर कसे आलात तुम्ही?
मी : नाही नुकताच महिला दिन साजरा झाला म्हणजे महिलांना आणखी प्रोत्साहन मिळेल.व्हॉटस्अपवर कालच मेसेज वाचला रोजच असतो महिला दिन पण आज फक्त जागतिक व अधिकृत महिला दिन. हा. .हा . .
विसरभोळे : झालं हसून व्हॉट्‌सऍपवर असे मेसेज पाठवायला काय जातंय पण खरे काय आहे ते माहीत आहे काय?
मी : म्हणजे? महिला दिन झाला ना? आणि तोही जागतिक.

विसरभोळे : आता जरा ऐका. शांत बसा. काही बोलू नका. मुळातच महिला दिन वेगळेपणाने साजरा करावा लागतोय हीच जागतिक शोकांतिका आहे. म्हणजेच महिला अनेक बाबतीत वंचित आहेत.
मी : असं कसं? मला नाही पटतं.
विसरभोळे : बघा बोललात तुम्ही. जरा ऐका. अधिकृत पणे युनोने आठ मार्च 1975 पासून जागतिक महिला दिन साजरा करायचे ठरवले. याचा मूळ हेतू लिंगभेद नसावा केवळ स्त्री म्हणून काही अधिकार नसावे किंवा स्त्रियांचे सबलीकरण हा व अनेक हेतू आहेत.दरवर्षी त्यामध्ये एक विशिष्ट थीम जोडली जाते. पण अजूनही तुम्ही काही गोष्टी ऐकाल तर थक्क व्हाल.
मी : म्हणजे सांगा जरा पाहू.

विसरभोळे : जगातील पहिल्या आठ श्रीमंत लोकांकडे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक संपत्ती एकवटलेली आहे. सप्टेंबर 2011 च्या जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर महिलांकडे फक्‍त जगातील एक टक्‍का संपत्ती आहे. आता त्यात थोडाफार फरक पडला असेल पण हेच वास्तव आहे.तसेच आजमितीला जगातील बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, लाटव्हिया, स्वीडन व लक्‍झेंबर्ग या फक्‍त सहा देशांमध्ये स्त्री व पुरुष यांना सर्व बाबतीत समान हक्‍क आहेत. एक दशकापूर्वी कोणत्याही देशात समान हक्क नव्हते. जगांतील 195 देशांपैकी फक्‍त हेच सहा देश स्त्री-पुरुष समान मानतात. जागतिक बॅंकेच्या नुकत्याच अहवालानुसार सर्व देशात स्त्री-पुरुष समानता यायला 2073 उजाडावे लागेल.
मी : बापरे हे तर फारच भयानक आहे हो सर.

विसरभोळे : भारतात सुमारे एक टक्‍का श्रीमंत लोकांकडे सत्तर टक्‍के संपत्ती एकवटलेली आहे. त्यातही स्त्रियांचा वाटा काय असेल तो मोठा संशोधनाचा विषय होईल. मुलगी सज्ञान झाली की पालकच वारसा संपत्तीवरील हक्‍कसोड लिहून घेतात. कित्येक वेळा त्यांना संपत्तीतून बेदखल केले जाते. अत्यल्प केसेसमध्ये कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातात. मग माहेरून संपत्ती न आणल्यामुळे सासरीही छळ होतो ते पाहतोच. सो कॉल्ड हायफाय सोसायटी अगदी टीचभर असते हो.त्यातून देशातील सर्वच महिलांचा अंदाज घेतला जाऊ शकत नाही.

भारतात तर स्त्रियांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री यांचे पद भूषवले आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प 45 वे अध्यक्ष झाले असून आजवर एकही महिला तेथे राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. पण अमेरिकेतील स्त्रियांशी भारतीय स्त्रिया सर्वच सामाजिक बाबतीत स्पर्धा करू शकतात का? आपल्याकडे आजही “बेटी बचाव, बेटी पढाव’, “माझी कन्या भाग्यश्री’ अशा योजना आणाव्या लागत आहेत. असे असताना आपण महिला दिनी व्हॉट्‌सऍपवर जोक पाठवत आहात. उलट असा विशेष दिन साजरा केला जाऊ नये एवढी सर्वच महिलांनी प्रगती केली पाहिजे. जरा वास्तवात शिरा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)