महिला ‘दीन’ नव्हे; “दिन…’

ओशो एक कथा सांगत, एका ठिकाणी एका संन्याशाचं प्रवचन चालत असे, हजारो लोकं रोज प्रवचन ऐकायला येत, लोकं पायाही पडत, पण कोणा स्त्रीला पाया पडण्याची परवानगी नव्हती, तशी ताकीदच होती.

एके दिवशी चुकून एका स्त्रीने त्यांच्या पायाला स्पर्श केला. गहजब माजला. त्या संन्याशाने याचं प्रायश्‍चित्त म्हणून सात दिवसांचा उपवास ठेवला, त्याच्या या उपवासाचा परिणाम असा झाला की हजारों स्त्रियां त्याच्या दर्शनासाठी गोळा होऊ लागल्या. रीघच लागली, साऱ्या स्त्रिया एकदम आनंदी होत्या, एकदम खुश! आलेल्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली की किती पवित्र आहेत हे संन्याशी! चुकून स्त्रीचा स्पर्श काय झाला, लगेच उपवास करून प्रायश्‍चित्त करत आहेत… आपण खरंच नशीबवान, म्हणून असे महात्मा आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाले, साऱ्या स्त्रिया स्वतःला धन्य मानू लागल्या.

खरंतर ज्या गोष्टीची चीड यायला हवी, तीच गोष्ट स्त्रियांनी सहर्ष स्वीकारली होती. वास्तविक एकाही स्त्रीने तिथं जायला नको होते. उलट स्त्री जातीने बहिष्कार टाकायला हवा होता कारण संन्याशाच्या या कृतीने स्त्री जातीचा अपमान झाला होता.पण पुरुषांनी स्त्रियांच्या डोक्‍यात रूजवून टाकलं की तुम्ही अपवित्र आहात, आणि स्त्रियांही यास राजी झाल्या. स्त्रीच्या स्पर्शाने जर कोणी अपवित्र होणार असेल,तर तो तर जन्माच्या क्षणा पासूनच अपवित्र ठरला, नाही का? स्त्रीच्या गर्भातून जन्माला आला, स्त्रीच्या अंगाखांद्यावर खेळला, वाढला… आणि तिचा स्पर्श अपवित्र करतो. काय गंमत आहे ना! पुरूषांनी किती पद्धतशीरपणे स्त्रियांच्या मनात रुजवुन टाकलं की, तुम्ही अपवित्र आहात आणि विशेष म्हणजे स्त्रियांनीही तितक्‍याच आनंदाने हे स्विकारले.

व्यवहारशास्त्र सांगते की समोरच्याने आपल्या कसे वागावे हे आपण दिलेल्या सुट व आपल्या वर्तणुकीवर अवलंबून असते.स्त्रियांनी नेहमीच पुरुषांवर अवलंबित राहण्यात धन्य मानले,मानसशास्त्र सांगते तुम्ही जितके अवलंबित राहता तितके तुमचे व्यक्तिमत्व कमकुवत होत जाते.

पण सुरुवातीपासूनच पुरूषांनी स्त्रियांना त्यांच्यावर अवलंबित ठेवले आणि याला छान असा मुलामा ही दिला. त्याचाच एक आणखिन उदाहरण म्हणजे लेडीज फर्स्ट, आख्या जगात हा शब्द स्त्री दाक्षिण्यासाठी वापरला जातो, स्त्री ही हा शब्द ऐकून सुखावते आणि या सुविधेचा लाभ ही घेते, पण तिला यामागील पुरुषी मानसिकतेचा ठाव घेता आला नाही, तिला कळालेच नाही की हे तिचे सन्मान नसून अपमान आहे. खरं तर पुरुष तिला ती दुबळी असल्याचे निदर्शनास आणून देत आहे, पुरूषांनी ही बाब गौरवाची असल्याचे सांगत चलाखीने स्त्रियांच्या गळी उतरवली. सामजिक असो पारिवारिक किंवा वैयक्तिक, स्त्रियांबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकारही पुरुषांनी स्वतः कडेच ठेवले, त्याने स्वतःच्या ताकदीचा वापर करत नेहमीच स्त्रीस ताब्यात ठेवले, आणि स्त्रीने संवेदनशीलपणा जपत, भरवसा ठेवत स्वतःस पुरुषांवर सोपविण्यातच धन्य समजले. पण तिच्या या निर्णयाचे दुष्परिणाम तिला पिढी दर पिढी भोगावे लागले. असे अनेक दाखले देता येतील ज्यात पुरुषवर्गाने मधाचे बोट देत तिच्यावर नको नको त्या जबाबदाऱ्या टाकल्या आणि तिने त्या निभावल्याही, निभावल्या कसल्या तर सोसल्या. पण आता मागील काही वर्षांपासून तिला तिच्या अस्तित्वाचे महत्व आणि हक्काची जाणीव होऊ लागली आहे, तिला तिच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागलाय, क्षमता कळायला लागली आहे, ती स्वतंत्र होऊ पाहते आहे.

ही चांगली बाब आहे, याने समाजस्वास्थ्य सुधारत जाईल. कारण या स्वातंत्र्या बरोबर येणारी जबाबदारी स्वीकारायला ही ती सज्ज असल्याचे दाखलेही मिळू लागले आहेत, पण हे करताना स्वातंत्रय म्हणून पुरुषांची बरोबरी करण्याआधी स्त्रीत्व नाकारणाऱ्या पुरुषी मानसिकते विरुद्ध लढा उभारणे हे तिचे पहिले कर्तव्य असायला हवे. स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाहीं याची काळजी ही तिने घ्यायला हवी.

मोकळीक मिळवली तरी नैतिकतेची व सभ्यतेची लगाम तिच्या हातीच असणार आहे. घर आणि बाहेर अश्‍या दोन जबाबदाऱ्या सांभाळताना तिला जास्त दक्ष रहावे लागणार आहे, अर्थातच हे सर्व काही पेलायला ती समर्थ आहेच.

– सत्येंद्र राठी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)