प्रेरणा : महिला उद्योजकांचा महिमा

-दत्तात्रय आंबुलकर

सुमारे 10 वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईतील तीन जिद्दी महिलांनी एकत्र येऊन उद्योजक बनण्याचे ठरविले. या महिलांची नावे होती गोकर्ण तायडे, ललिता पाटील व निलीमा चव्हाण. तिघींचा एकच समान छंद व ध्यास म्हणजे स्वयंपाक बनविणे. आपल्या याच ध्यासाला प्रयत्न आणि उद्यमशीलतेची साथ देण्याच्या उद्देशाने यांनी संकल्प महिला औद्योगिक उत्पादन संस्था म्हणजेच “संकल्प’ या विश्‍वस्त संस्थेची स्थापना केली.

संस्थेच्या अध्यक्षा म्हणून तायडे, उपाध्यक्षपदी पाटील तर सचिव म्हणून चव्हाण यशस्वीपणे कार्यरत असून गेल्या दहा वर्षांत या तीन महिलांच्या प्रयत्नांमुळे 400 हून अधिक महिलांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे. या तिन्ही महिलांच्या पूर्वायुष्यातील समान मुद्दा म्हणजे आधीच्या गरिबीमुळे त्यांच्या संसारी आयुष्याची सुरुवात झोपडपट्टीत झाली. मात्र, परिस्थितीपुढे हतबल न होता त्यावर मात करून तोडगा काढण्याचा या तिघींचा निर्धार होता व त्यानुसार त्यांनी प्रयत्न पण सुरू केले.

त्यांच्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात या तिघींना गणेशोत्सव, दिवाळीसारख्या सणउत्सवात मिठाई, फराळाचे सामान बनविण्यासारखी कामे मिळायला लागली. त्याशिवाय गरजूंना जेवणाचे डबे देण्याचे काम त्या करायच्या. त्यांच्या या प्रयत्नांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळू लागला. मात्र, मिळालेला हा प्रतिसाद आणि यशामुळे त्या तिघी संतुष्ट नव्हत्या. त्यांना त्याहून अधिक मोठे काम करायचे होते.

त्यादृष्टीने त्यांनी सविस्तर माहिती घेऊन मुंबई विकास प्राधिकरणाची माहिती आणि मदत घेऊन या प्रयत्नातून संकल्प महिला उत्पादक सहकारी संस्था उभारली. संस्थेची रितसर स्थापना झाल्यावर त्यांनी त्यांच्याप्रमाणेच सहकारी तत्त्वावर व परिश्रमपूर्वक प्रयत्न करणाऱ्या महिलांना “संकल्प’मध्ये सामावून घेतले. यामुळे तीन महिलांच्या या मर्यादित प्रयत्नांना व्यापक पाठबळ आणि यश मिळू लागले.

मुंबईतील गरजू व काम करू इच्छिणाऱ्या महिलांची एक सहकारी तत्त्वावर चालणारी संस्था या भूमिकेतून “संकल्प’चे काम चालते आणि संस्था निराधार महिलांना विशेष मदत व आधार देण्याचे काम करते. संस्थेला मिळणारे सहकार्य व महिलांचा वाढता सहभाग यामुळे आज मुंबईतील तीन प्रमुख व्यवसाय केंद्रावर संस्थेचे काम चालत आहे.

“संकल्प’च्या या व्यवसाय केंद्रांद्वारे लोकांना महाराष्ट्रीय पद्धतीने जेवण बनवून ते पुरविणे हे काम मोठ्या प्रमाणावर चालते. याशिवाय मोठ्या संस्था-कार्यालयांमधील 14 ठिकाणच्या उपहारगृहांद्वारा तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भोजनपुरवठा नियमितपणे केला जातो. याशिवाय विवाह वा अन्य समारंभ-कार्यक्रमांसाठी गरजेनुसार भोजन पुरविले जाते हे विशेष. आज आपल्या प्रयत्न आणि संस्थेच्या संकल्पयात्रेचा मागोवा घेताना संकल्पच्या संस्थापक तायडे, पाटील व चव्हाण आवर्जून नमूद करतात की, संकल्पचा झालेला मुख्य फायदा म्हणजे त्या आज खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाल्या आहेत.

व्यवसाय-आर्थिक व्यवहाराचे निर्णय त्या स्वतः घेऊ शकतात हे मोठेच परिवर्तन झाले आहे. “संकल्प’च्या सध्याच्या ध्येयानुसार आज संस्थेला व महिला सदस्यांना झालेला फायदा त्या संस्थेच्या व्यावसायिक वाढ विकासासाठी खर्च करतात. संस्थेला अधिकाधिक संस्था व सेवा केंद्रांद्वारे आपला विस्तार करायचा असून पुढे संस्थेची सदस्यसंख्या 500 वर नेण्याचा “संकल्प’ नव्याने करण्यात आला असून, त्यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)