वूमन पॉवर 

महाराणी गायत्री देवी या भारतीय राजकारणात “ब्युटी विथ ब्रेन’ म्हणूून ओळखल्या जातात. 1962 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी जयपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजयी झाल्या. मतदारसंघातील 2.96 लाख मतांपैकी 1.93 लाख मते गायत्री देवींना मिळाली. त्यावेळी त्यांचे नाव सर्वाधिक मते मिळाल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले होते.

जयपूर राजघराण्याच्या महाराणी असणाऱ्या गायत्रीदेवींच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यांनी तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. 1962 मध्ये त्यांनी सी. राजगोपालाचारी यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र पार्टीतर्फे राजकारणात पाऊल ठेवले आणि त्याच वर्षी जयपूरची निवडणूक जिंकून तिसऱ्या लोकसभेच्या सदस्या बनल्या. 1967 आणि 1971 मध्येही त्यांनी स्वतंत्र पार्टीतर्फे जयपूरमधूनच लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

1965 मध्ये त्यांना लालबहाद्दूर शास्रींकडून कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्योळी त्यांचे पती सवाई मानसिंह द्वितीय हे स्पेनमध्ये भारताचे राजदूत होते. पण तरीही गायत्री देवी सरकारमध्ये सामील झाल्या नाहीत. त्यांनी भैरवसिंह शेखावत यांच्यासोबत जनसंघाशी आघाडी केली. इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी जाहीर केली तेव्हा अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यामध्ये गायत्रीदेवींनाही कारावास झाला होता. जवळपास 5 महिने त्या तिहारच्या तुरुंगात होत्या. गायत्रीदेवी या गरिबांसाठी सहृदयतेने कार्य करणाऱ्या समाजसेविका होत्या. जगप्रसिद्ध व्होग या मासिकाने महाराणी गायत्री यांचा समावेश जगातील 10 सर्वांत सुंदर महिलांमध्ये केला होता. 29 जुलै 2009 मध्ये त्यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)