वुमन पॉवर : मणिबेन पटेल

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कन्या मणिबेन पटेल या पहिल्या लोकसभेमध्ये खासदार होत्या. अर्थात, केवळ सरदार पटेलांची कन्या एवढीच त्यांची ओळख नव्हती तर त्या समर्पित स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी नेत्या होत्या. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन 1918 नंतर त्यांनी अहमदाबादेतील गांधीजींच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला आणि तेथून त्या राष्ट्रसेवेच्या कार्यात सामील झाल्या. त्या सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. मणिबेन यांनी असहकार आंदोलन आणि मिठाचा सत्याग्रह या गांधीजींच्या दोन्ही आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 1928 मध्ये बारडोलीत झालेल्या सत्याग्रहामध्ये सहभागी होण्यास महिला कचरत होत्या. त्यावेळी मणिबेन यांनी मिठूबेन पेटिट आणि भक्‍तीबा देसाई यांच्यासोबतीने महिलांना या सत्याग्रहात सहभागी करून घेतले.

1930 पासून त्या आपल्या वडिलांचा उजवा हात म्हणून काम करत होत्या. सरदारांचे प्रत्येक काम त्या आपल्या डायरीमध्ये नोंदवून ठेवत असत. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये मणिबेन या राजकारणातील बारकावे समजून घेत असत. 1950 मध्ये वल्लभभाईंचे निधन झाले, तोपर्यंत मणिबेन सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत होत्या.

काही दशकांपर्यंत त्या खासदार राहिल्या. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. चार वेळा लोकसभा आणि एकदा राज्यसभेवर निवडून गेलेल्या मणिबेन गुजरात प्रदेश कॉंग्रेसच्या राजकारणातही सक्रिय होत्या. 1957 पासून चार वर्षे त्या गुजरात कॉंग्रेसच्या सचिव आणि नंतर उपाध्यक्ष राहिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)