अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अंबवडेतील बंधारा वाहू लागला

दरवाजे न उघडल्यास पुढील वर्षी पाणीटंचाईचे तीव्र सावट

कराड –
गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबवडे, ता. कराड येथील वांग नदीवरील के. टी. वेअर बंधारा पूर्णपणे भरून वाहून लागला आहे. या बंधाऱ्यावरील दरवाजे प्रतिवर्षी 25 मे रोजी काढले जातात. मात्र ते काढले न गेल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. खूप वर्षांपूर्वी हा बंधारा बांधण्यात आल्याने पाण्याच्या गतीमुळे बंधाऱ्याचे नुकसान होऊन नदीचे पाणी वाहून जाऊ शकते. परिणामी पुढील वर्षी या परिसरातील लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे येथील लोकांवर ही वेळ येण्याची शक्‍यता आहे.

वांग नदीच्या पाण्याला मोठी गती असल्यामुळे या नदीवर आंबवडे येथे केटीवेअरचा बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा दगडी बांधकामात करण्यात आला आहे. या बंधाऱ्यांची दुरूस्ती करणे खूप अवघड असते. यापूर्वी पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक बंधारे वाहून गेले आहे. मालदनचा बंधाराही पूर्णत: वाहून गेला आहे. अशीच अवस्था या बंधाऱ्याची होऊ नये. यासाठी दहा वर्षापूर्वी स्थानिक लोकांच्या कल्पनेने एका अभियंत्याने त्याची दुरूस्ती केली होती. तेव्हापासून प्रतिवर्षी 25 मे ला बंधाऱ्याचे दरवाजे काढले जातात. आणि साधारणत: ऑक्‍टोबर महिन्यात पुन्हा या बंधाऱ्याला दरवाजे लावले जातात. त्यामुळे या भागातील अंबवडे, कोळे, कोळेवाडी, पांढरीचीवाडी, तारूख या गावांचा पाण्याचा मोठा प्रश्‍न मिटला आहे.

जून महिन्यात पावसाने दडी मारली असली तरी महिन्याच्या अखेरीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वांग नदीला मोठे पाणी आले आहे. बंधाऱ्याचे दरवाजे काढले नसल्याने बंधारा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. गढूळ पाणी वाहून जाऊन सध्या नदीच्या स्वच्छ पाण्याने बंधारा भरून वाहत आहे. वांग नदीच्या वेगवान पाण्यामुळे तेथील बंधारे यापूर्वी वाहून गेलेले आहेत. सध्या पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे हा बंधारा वाहून जाण्याची शक्‍यता आहे. कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्या दुर्लक्षामुळेच आज ही वेळ आली असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत. त्यांनी ड्रोन सर्व्हेत विहिरीवरील क्षेत्राचीही आकारणी केल्याची तक्रार आहे. बंधारा वाचविण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष घालावे. अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)