14 गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार
नगर –जिल्ह्यात गेल्या साडेतीन वर्षांमध्ये एटीएम फोडण्याच्या 26 घटना घडल्या असून त्यापैकी 14 गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार आहेत. दिवसेंदिवस एटीएम फोडण्याचे प्रकार वाढत आहेत. अर्थात एटीएमच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून अद्यापही कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे आढळून येत आहे. नुकतीच केडगावमधील एटीएममधून आतापर्यंत साडेआठ लाख चोरीच गेले आहे. उर्वरित गुन्ह्यांमध्ये रकम चोरी गेलेली नाही. केवळ एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.
नगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या बॅंकेचे पाचशेहून अधिक एटीएम आहेत. अनेक एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याने चोरटे याचा फायदा घेवून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील विविध बॅंकेचे 26 एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. नगर शहरामध्ये एटीएम फोडीच्या दहा घटना घडल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा घटना घडल्या असून, राहुरी तालुक्यात तीन, शेवगावमध्ये दोन, संगमनेरमध्ये तीन घटना घडल्या आहेत. 26 गुन्ह्यांपैकी एमआयडीसीतील एक गुन्ह्यात, आश्वी व सुपा पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नगर शहरामध्ये केडगाव हद्दीत एक व सावेडी व गुलमोहर रोडवर एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये केडगाव येथील एटीएममधून साडे आठ लाख रूपये चोरुन नेले होते. शहरात घरफोडी, मोटारसायल चोरी, धूमस्टाईलने दागिने लांबविणे अशा घटनामध्ये वाढ होत असून चोरट्यांनी आता एटीएम फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यांना वेळीच चपराक बसावी, यासाठी पोलीसांनीही ठोस पावले उचलली पाहिजे, असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.