पुण्यात ‘इंजिना’ची ‘हाता’ला साथ

पुणे – लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील एकही जागा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला नसला तरी, पुण्यात मनसेकडून कॉंग्रेसच्या उमेदवाराला साथ देण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अद्याप कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला नसला तरी, मनसेने संभावित उमेदवारांसमवेत हातमिळवणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्मान सेना या लोकसभा निवडणुकीत आघाडीतून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची अटकळ घातली जात होती. मात्र, कॉंग्रेसने त्यास विरोध केला होता. त्यामुळे मनसेला आघाडीतून दूर राहावे लागले आहे. मात्र, त्याचवेळी राज ठाकरे यांनी आपण निवडणूक लढविणार नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देशातून बाहेर घालवा असे सांगत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांच्या विरोधात असलेल्या पक्षांना मनसे मदत करणार असल्याचे बोलले जात होते. तर पुण्यातही मनसेची जवळपास लाखभर मते लोकसभेसाठी निश्‍चित असल्याने ती कोणाच्या पारड्यात जाणार याबाबत अटकळ बांधली होती. मात्र, आता पक्षाकडून पुण्यातील कॉंग्रेस उमेदवाराला मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पक्षाकडून अधिकृतपणे त्याबाबत घोषणा केली नसली तरी, पुण्यात हातमिळवणी झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

पुण्यातील सभेची उत्सूकता
पक्ष निवडणूक लढविणार नसला तरी, राज ठाकरे हे भाजप विरोधासाठी सभा घेणार आहेत. त्यांची एक सभा पुण्यात होण्याचीही शक्‍यता असून त्यात आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिला जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुण्यात आघाडीच्या उमेदवारांसाठी ही सभा नसली तरी, भाजपच्या विरोधात असणार मनसेकडून भाजपविरोधी उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जाईल असे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)