वाई शहराची दिवाळी “कचऱ्यात ढिगात’

नगरसेवक सतीश वैराट, सुमैय्या इनामदारांचा पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा

-दोन दिवसांपासून घंटागाडी बंदी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

-चौकाचौकात कचऱ्याचे ढीग

-प्रभाग दोनमधील नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

वाई – शहरातून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या गत तीन-चार दिवसांपासून बंद असल्याने शहरातील चौकाचौकात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. शहरातील कचराकुंड्या भरुन वाहत असून या सर्व प्रकाराला पालिका प्रशासनच जबाबदार आहे. सध्या शहरातील रस्त्यांवरुन ओसंडत वाहत असलेल्या कचऱ्यामुळे वाईकरांना कचऱ्याच्या ढिगातच आपली दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

दरम्यान, पालिका प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरण्याचा उद्योग बंद करुन त्वरीत घंटागाड्या सुरु कराव्यात अन्यथा प्रभाग 2 मधील सर्व कचरा पालिकेच्या दारात टाकून पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा नगरसेवक सतीश वैराट आणि सुमैय्या इनामदार यांनी दिला आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन तशा आशयाचे लेखी निवेदनही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना देण्यात आले आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे, पालिकेच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व प्रशासनाच्या अतिशय ढिम्म पद्धतीच्या कारभारामुळे शहराच्या प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा केविलवाणा प्रकार त्वरित थांबविण्यात येवून शहरातील कचरा त्वरित उचलण्यात यावा त्यासाठी प्रभाग दोन मधील नगरसेवक प्रशासनाला पालिकेत गप्प बसून देणार नाहीत.

सध्या सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम चालू असून वाईकर नागरिक मात्र दारातील कचरा कधी उचलला जाणार या विवेचनात आहेत. वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कायम रजेवरच असल्याने प्रशासन सध्या कोणाच्या आदेशावर चालणार असाही प्रश्न सध्या वाईकरांना भेडसावत आहे. त्यातच नगराध्यक्षासह संबंधित आरोग्य विभागाला त्याचे कसलेही सोयीरसुतक नाही.

प्रभाग दोन मधील नगरसेवकांनी स्वतःच्या खर्चांनी खाजगी ट्रॅक्‍टर लावून प्रभागातील कचरा उचलून नागरिकांना दिलासा दिला आहे. परंतु ही कृती दुर्दैवाने दुसऱ्या कोणत्याही प्रभागात दिसत नाही. सिद्धनाथवाडीत सध्या डेंगुच्या साथीने थैमान घातले आहे. तरीही संबंधित प्रभागातील नगरसेवकांनी असे कोणतेही धाडसी पाऊल न उचलल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्षांच्या प्रभागातच डेंग्युची साथ आटोक्‍यात येत नसेल तर बाकी प्रभागांची अवस्था न विचारलेली बरी अशा प्रतिक्रिया सध्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

कचरा पडत असलेल्या ठिकाणी शहरातील भटक्‍या जनावरांचा वावर वाढला आहेत. तसेच कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे त्वरित घंटागाडीची व्यवस्था करावी अन्यथा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दिवाळीसारख्या पवित्र सणाच्या उत्सवात नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार न करता शहरातील कचऱ्याची विल्हेवाट त्वरित लावावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून पालिकेला ठाळे ठोकण्यात येईल, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर प्रभाग दोन मधील नगरसेवकांच्या सह्या आहेत.

पालिकेच्या मुख्याधिकारी नॉट रिचेबल
पालिकेच्या मुख्याधिकारी वाई नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यापासून नेहमी रजेवर असतात. तसेच त्यांना फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा त्यांचा फोन “नॉट रिचेबल’ लागतो. याचा प्रत्यय दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाही आला आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढून अहवाल सादर करा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, सध्या वाई शहरातील घंटागाडी काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मुख्याधिकारी नेहमीप्रमाणे “नॉट रिचेबल’च असल्याचा प्रत्यय पुन्हा नागरिकांसह नगरसेवकांना आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)