कॉंग्रेसमधून विखे गट नामशेष होण्याच्या मार्गावर ; नगर दक्षिणेत नावालाच उरली कॉंग्रेस

कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्याचे थोरातांपुढे आव्हान

जयंत कुलकर्णी/नगर: कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आता सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविल्यानंतर अधिच अडचणीत असलेल्या कॉंग्रेसमधून विखे गट बाजूला झाला आहे. ना. विखे अद्याप कॉंग्रेसमध्ये असले, तरी त्यांचे कट्टर समर्थक मात्र डॉ. सुजय विखे यांच्या मागे गेल्याने आजतरी कॉंग्रेसमधून विखे गट नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉंग्रेस अंतर्गत विखेंचे विरोधक माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यापुढे जिल्ह्यात कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यात नगर दक्षिणेत तर नावालाच कॉंग्रेस उरली असल्याने आघाडीच्या उमेदवाराची सर्व भिस्त आता राष्ट्रवादीवर येऊन पडली आहे.

बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेस अवघ्या तीन विधानसभा मतदारसंघांत प्रभावीपणे दिसत होती. कॉंग्रेसअंतर्गत विखे-थोरात संघर्ष जिल्ह्याला नाही तर राज्याला सर्वश्रृत आहे. या संघर्षांमुळे जिल्ह्यात कॉंग्रेस वाढीला मर्यादा पडल्या होत्या. या दोन्ही नेत्यांचा वाद हा टोकाचा असल्याने जिल्ह्यात दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडत. त्यातून मार्ग काढण्यात आला. दोन्ही नेत्यांकडे जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांचे आपल्या समर्थकांच्या हिशेबाने वाटप करण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही नेते आपल्या वाट्याला असलेल्या तालुक्‍यात लक्ष केंद्रीत करीत होते. सहाजिक दुसऱ्या नेत्याच्या समर्थकांवर अन्याय होत होता. त्यातून या समर्थकांनी दुसरे पर्याय निवडले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसचे अस्तित्व काही तालुक्‍यांपुरतेच मर्यादीत राहिले. एवढेच नाही तर नव्याने पक्ष प्रवेश करणाऱ्यांनाही अडचणीचे ठरत. कोणाचे नेतृत्व स्वीकारावे, असा प्रश्‍न पडत असल्याने ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास धजावत नव्हते. अर्थात विखे व थोरात हे दोन्ही नेते राज्यपातळीवरचे असल्याने पक्षश्रेष्ठींनी देखील कधी जिल्ह्यात लक्ष घातले नाही.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने त्यांनी ही जागा कॉंग्रेस (विखेंसाठी) सोडली नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेच्या तयारीला लागलेल्या डॉ. सुजय विखे यांनी आघाडीचा नाद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने डॉ. विखे यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. परंतु कॉंग्रेसमधील विखे गट मात्र कॉंग्रेसमध्ये राहिला नाही. या गटातील बहुतांशी प्रमुख नेते व कार्यकर्ते आज डॉ. विखेंबरोबर आहेत. काहींनी खुल्या पद्धतीने डॉ. विखेंचे काम सुरू केले असले, तरी काहींनी मात्र अप्रत्यक्षरित्या काम करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील विखे गटाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. साहजिक कॉंग्रेस वाढविण्याबरोबर ती टिकविण्याची जबाबदारी आ. थोरात यांच्यावर पडली आहे. नुकत्याच झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्याला केवळ आ. थोरात समर्थकांची गर्दी मोठी होती. विखे गटाचा एकही कार्यकर्ता या मेळाव्याकडे फिरकला नाही.

नगर दक्षिणेत श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, नगर शहर या ठिकाणी काय तो कॉंग्रेसचा प्रभाव दिसत होता. पण विखेंच्या भाजप प्रवेशानंतर हे चित्र बदलले आहे. ना. विखे हे कॉंग्रेसमध्ये असले तरी त्यांचे समर्थक मात्र त्यांच्या कॉंग्रेसमध्ये आता राहिले नाहीत. ते डॉ. विखेंच्या मागे गेले आहेत. श्रीगोंद्यात आता केवळ नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे कॉंग्रेसची खिंड लढवित आहे. अन्य अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब नहाटा, भगवान पाचपुते, सुभाष डांगे हे आज डॉ. विखेंच्या मागे गेले आहेत. कर्जतमध्ये अंबादास पिसाळ तर जामखेडमध्ये जगन्नाथ राळेभात ही मंडळी देखील भाजपच्या वाटेवर आहेत. पारनेरमध्ये सभापती राहुल झावरे, राहुल शिंदे, संभाजी रोहोकले, डॉ. शिरोळे आदींनी डॉ. विखेंबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी, शेवगाव या दोन तालुक्‍यांत तर कॉंग्रेसचे अस्तित्व राहिले नाही. शेवगावमध्ये वसंत कापरे ही आता डॉ. विखेंबरोबर आहेत.

नगर तालुक्‍यात आ. थोरात व ना. विखेंना मानणारे समर्थक मोठ्या संख्येने असले, तरी गेल्या काही वर्षांपासून या सर्व समर्थकांनी एकत्रित शिवसेनेबरोबर महाआघाडी केली आहे. माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, प्रताप शेळके, अरुण होळकर, संपतराव म्हस्के हे महाआघाडीत असून, त्याचा संघर्ष हा आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुण जगताप यांच्याशी आहेत. हराळ, होळकर हे विखेंचे, तर दादा पाटील शेळके, म्हस्के हे आ. थोरातांचे समर्थक आहेत. परंतु या नेत्यांची लढाई आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी असल्याने ते पक्षात केवळ नावालाच आहेत. नगर शहरात तर कॉंग्रेस आता बोटावर मोजता येईल अशी स्थिती आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत केवळ 4 चार जागा कॉंग्रेसला मिळाल्या असून, त्यात तीन नगरसेवक हे डॉ. विखे गटाचे, तर एकच आ. थोरात गटाला मानणारा आहे. या तीनही नगरसेवकांनी आता विखेंचा झेंडा हातात घेतला आहे. केडगावमध्ये काय ती कॉंग्रेसची ताकद होती तीही आता भाजपमध्ये गेली आहे. राहुरी तालुक्‍यातील सुरेश कर्पे व सुभाष पाटील यांच्यासह विकास मंडळाचे बहुतांशी नेते व कार्यकर्ते हे विखेंना मानणारे आहेत. त्यामुळे ही मंडळी कॉंग्रेसपेक्षाही व्यक्‍तीनिष्ठा मानणारे असल्याने डॉ. विखेंच्या मागे उभे आहेत. अशी परिस्थिती नगर दक्षिणेत असून, कॉंग्रेस नावालाच उरली असल्याचे दिसते.


ना. विखे यांचा गाठीभेटींवर भर

सध्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे मात्र कोंडीत सापडले आहेत. कॉंग्रेसमध्ये राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच नगर दक्षिणेत प्रचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु पुत्रप्रेम त्यांना गप्प बसू देत नाही. त्यांनी आपल्या समर्थकांच्या गाठीभेट घेऊन डॉ. सुजय विखेंना मदत करण्याची विनंती कार्यकर्त्यांना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेही आता फारकाळ कॉंग्रेसमध्ये राहतील, अशी स्थिती दिसत नाही. पक्षाने स्टारप्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव घेतले असले, तरी ना. विखे सध्या जिल्ह्यात मुक्‍कामी असून, ते पक्षाच्या बैठका व कार्यक्रमांना दिसत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)