गोसाव्याचीवाडी कुस्ती मैदानात पांडुरंग मांडवे विजेता

वडूज – गोसाव्याचीवाडी, ता. खटाव येथील ग्रामदैवत श्रीहनुमान देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानास यावर्षी मल्ल व कुस्ती शौकीनांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मैदानात भोसले व्यायामशाळेचा मल्ल मोठा पांडुरंग मांडवे (नागाचे कुमठे) याने हप्ता डावावर औंदुबर मासाळला चितपट करत प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.

द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत रहिमतपूरच्या प्रवीण शेरकरने भोसले व्यायामशाळेच्या दादा थोरातला चितपट करून 75 हजाराचे इनाम जिंकले. तृतीय क्रमांकाची मनोज कदम (सांगली) व प्रतिक माने (रहिमतपूर) यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. शाहुपुरी तालमीच्या अक्षय मांडवेने मायणीच्या रतन कमानेस पराभूत करुन 31 हजारांचे बक्षीस जिंकले. लांडेवाडीच्या संग्राम सुर्यवंशीने चटकदार कुस्ती करून रहिमतपूरच्या सौरभ शेरकरवर मात केली. अक्षय मांडवे व सुर्यवंशी यांच्यावर रसिक प्रेक्षकांनी बक्षीसाची खैरात केली. सुर्यवंशी यास संयोजकाच्या वतीने मानाची गदा बक्षीस देण्यात आली. नागझरीच्या श्रावणी भोसलेने पुरुष मल्लास चितपट करुन रसिकांची वाहवा मिळविली. कु. भोसले व नागाचे कुमठे येथील श्रेया मांडवे यांची कुस्ती चटकदार झाली.

वसंतराव जानकर, किसन आमले, शामराव माने, गणेश माने, नितीन शिंदे, वामन बोडरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. उमेश पाटील यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले. इचलकरंजीच्या कांबळे ग्रुपच्या हलगी वादनाने मैदानास चांगलीच रंगत आणली. माजी आ. प्रभाकर घार्गे, माजी जि. प. अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी शिवाजी सर्वगोड, संदीप मांडवे, धर्माजी मांडवे, धनंजय क्षीरसागर आदिंसह मान्यवरांनी कुस्ती फडास भेट देवून संयोजकांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)