वादळी पावसाचा महावितरणला फटका

14 कोटी रुपयांचे नुकसान : विजेचे 8 हजार खांब जमीनदोस्त

पुणे – मे आणि जूनमध्ये राज्याच्या विविध भागात अवकाळी आणि वादळी पाऊस झाला. याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला आहे. त्यामध्ये तब्बल 14 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, विदर्भात विजेचे आठ हजार खांब जमीनदोस्त झाले असून जवळपास हजार किलोमीटरच्या वीजवाहिन्या तुटल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महावितरणच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रत्येक परिमंडलात मान्सूनपूर्व आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतात. मात्र, अवकाळी पावसामुळे प्रशासनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागतो. विजेचे खांब पडणे, तारा तुटणे, वीज उपकेंद्रांमध्ये बिघाड होणे यांसह अन्य घटना सातत्याने घडतात. त्याचा फटका प्रशासनाला बसतो. त्याशिवाय तासन्‌तास वीज गायब होत असल्याने ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

यंदा वारे आणि पावसामुळे उच्च दाबाचे 2 हजार 50, तर लघु दाबाचे 5 हजार 700 विजेचे खांब पडले. तसेच उच्च दाबाच्या 350 किलोमीटर आणि लघु दाबाच्या 700 किलोमीटर वीज तारा तुटल्या. 50 रोहित्र कायमचे, तर 150 हून अधिक रोहित्र अंशत: बंद पडले. सव्वाशेहून अधिक वितरण पेट्या, शंभराहून अधिक मीटरही नादुरुस्त झाले. या वादळाचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसला आहे.

यासंदर्भात महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल म्हणाले, ‘प्रशासनाला नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. तरीही, वीजपुरवठा सुरळीत करण्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले आहे. यापुढील कालावधीतही वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)