विम्बल्डन टेनिस स्पर्धा: दिविज-सिटॅक कडव्या झुंजीनंतर पराभूत

लंडन: भारताचा युवा टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा साथीदार न्यूझीलंडचा आर्टेम सिटॅक या जोडीला माईक ब्रायन आणि जॅक सॉक या सातव्या मानांकित अनुभवी अमेरिकन जोडीविरुद्ध कडवी झुंज दिल्यानंतर निसटता पराभव पत्करावा लागल्याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

परंतु उपान्त्यपूर्व फेरीतील त्यांची झुंज संस्मरणीय ठरली. दिविज-आर्टेम जोडीला अखेर 6-7, 6-7, 7-6, 4-6 असा तीन तास 14 मिनिटांच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला.

पुरुष दुहेरीतील अन्य उपान्त्यपूर्व लढतीत फ्रेडरिक निल्सन व जो सॅलिसबरी या बिगरमानांकित जोडीने बेन मॅकलॅछन व योहान स्ट्रफ या 14व्या मानांकित जोडीचे आव्हान 7-6, 4-6, 7-6, 7-6 असे मोडून काढताना उपान्त्य फेरी गाठली. तसेच रॅव्हेन क्‍लासेन व मायकेल व्हीनस या 13व्या मानांकित जोडीने जेमी मरे व ब्रूनो सोरेस या पाचव्या मानांकित जोडीवर 6-7, 7-6, 5-7, 7-6, 6-4 अशी प्रदीर्घ झुंजीनंतर सनसनाटी मात करताना उपान्त्य फेरीत धडक मारली.

डॉमिनिक इनग्लॉट व फ्रॅंको स्कुगर या 15व्या मानांकित जोडीनेही रॉबिन हॅसे व रॉबर्ट लिंडस्टेड या बिगरमानांकित जोडीचा 6-3, 6-7, 7-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपान्त्य फेरीतील अखेरचे स्थान पटकावले.
अलेक्‍झांडर पेया व निकोल मेलिचार या 11व्या मानांकित जोडीने एदुआर्द रॉजर व्हॅसेलिन व सेबॅस्टि लाव्हाकोव्हा या पाचव्या मानांकित जोडीला 7-6, 4-6, 9-7 असे चकित करताना मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. तर इव्हान डॉडिग व लतिशा चॅन या तृतीय मानांकित जोडीने हेन्‍रकी कॉन्टिनेन व हीथर वॉटसन या 16व्या मानांकित जोडीचा 6-2, 7-6 असा सहज पराभव करीत मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तसेच जीन ज्युलियन रॉजर्स व डेमी स्कर्स या हॉलंडच्या चतुर्थ मानांकित जोडीने एरी होझुमी व बेन मॅकलॅचन या 14व्या मानांकित जोडीचा 6-4, 6-1 असा धुव्वा उडवीत मिश्र दहेरीची उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

त्याआधी जपानच्या 24व्या मानांकित केई निशिकोरीने अर्नेस्ट गल्बिसला 4-6, 7-6, 7-6, 6-1 असे पराभूत करताना पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. निशिकोरी हा तब्बल 23 वर्षांनंतर विम्बल्डनची उपान्त्यपूर्व फेरी गाठणारा पहिला जपानी खेळाडू ठरला आहे. निशिकोरीसमोर आता माजी विजेत्या नोव्हाक जोकोविचचे कडवे आव्हान आहे. बाराव्या मानांकित जोकोविचने रशियाच्या केरेन खाचानोव्हचा 6-4, 6-2, 6-2 असा फडशा पाडताना उपान्त्यपूर्व फेरीतील स्थान निश्‍चित केले.

त्याआधी अग्रमानांकित रॉजर फेडरर, द्वितीय मानांकित राफेल नदाल, आठवा मानांकित केविन अँडरसन, नववा मानांकित जॉन इस्नर व तेरावा मानांकित मिलोस रावनिच या प्रमुख मानांकितांनीही वेगवेगळ्या सैलीतील विजयासह उपान्त्यपूर्व फेरी गाठली. पाचवा मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रोने सिमॉन जाईल्सचा 7-6, 7-6, 5-7, 7-6 असा पराभव करताना फेडररविरुद्धच्या उपान्त्यपूर्व लढतीची निश्‍चिती केली.

त्याआधी फेडररने ऍड्रियन मॅनारिनोला 6-0, 7-5, 6-4 असे पराभूत करताना केविन अँडरसनविरुद्धच्या उपान्त्यपूर्व लढतीची निश्‍चिती केली. अँडरसनने फ्रान्सच्या गेल मॉन्फिल्सचा कडवा प्रतिकार 7-6, 7-6, 5-7, 7-6 असा सुमारे चार तासांच्या लढतीनंतर संपुष्टात आणताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. द्वितीय मानांकित राफेल नदालने मात्र यिरी व्हेसेलीचा 6-3, 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविला. नदालसमोर आता डेल पोट्रो व सिमॉन जाईल्स यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.

चौथ्या उपान्त्यपूर्व सामन्यात 13व्या मानांकित मिलोस रावनिचसमोर नवव्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान आहे. रावनिचने अमेरिकेच्या बिगरमानांकित मॅकेन्झी मॅकडोनाल्डचा प्रतिकार 6-4, 6-3, 6-7, 6-2 असा मोडून काढला, तर इस्नरने ग्रीसच्या स्टेफानोस त्सिस्तिपासला 6-4, 7-6, 7-6 असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. फेडरर विक्रमी नवव्यांदा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)