पाण्याच्या चाळीस टाक्‍या कोसळण्याची वाट पाहणार का?

जिल्हा परिषदेला धोकादायक टाक्‍या पाडण्याचा विसर : दीड वर्षात केवळ 9 टाक्‍या जमीनदोस्त

नगर – जिल्ह्यात विविध पाणीयोजनांमधून पिण्याच्या पाण्यासाठी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्‍यांमध्ये तब्बल 40 टाक्‍या धोकादायक असल्याचे दीड वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले असतांनाही अजूनही या टाक्‍या पाडण्यास मुहूर्त सापडला नाही. आता या टाक्‍या कोसळून वित्त व जीवित हानी होण्याची वाट जिल्हा परिषद प्रशासन पाहत आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.

मंगळवारी सकाळी देहेरे येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू असतांना स्लॅब कोसळला. यात आठजण जखमी झाले आहे. त्यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील धोकादायक पाण्याच्या टाक्‍याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन वर्षापूर्वी कर्जत शहरातील पाण्याची टाकी कोसळली होती. यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होवून जिल्ह्यातील धोकादायक पाण्याच्या टाक्‍यांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात विविध पाणीयोजनांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या टाक्‍यांपैकी 49 टाक्‍या धोकादायक असल्याचे आढळून आले होते.

या पाण्याच्या टाक्‍या कधरही कोसळू शकतील. त्यामुळे त्या पाडण्यात याव्यात असे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी अहवाल देखील दिला होता. परंतू आज हा अहवाल येवून दीड वर्ष लोटली तरी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीमधील पाण्याच्या टाक्‍या पाडाव्यात असे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे.

स्वतंत्र व प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून पाण्याच्या टाक्‍या उभारण्यात आल्या आहे. आता या टाक्‍यांची आर्युमर्यादा तशी संपली आहे. जिल्हा परिषदेच्या अहवालानंतर आता दीड वर्ष झाले आहे. तरी या टाक्‍या पाडण्याबाबत जिल्हा परिषदस्तरावर काही देणे-घेणे नाही अशाच पद्धतीने कामकाज चालू आहे. जुनाट, मोडकळीस आलेल्या टाक्‍या 70 ते 80 च्या दशकांतील आहेत. या टाक्‍या तत्कालीन लोकसंख्येचा विचार करून उभारण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जुनाट व धोकादायक टाक्‍याचे सर्व्हेक्षण केले होते. त्यात 49 टाक्‍या धोकादायक असल्याचे समोर आहे. त्या टाक्‍या पाडण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. परंतू त्या पाडणार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला. ग्रामपंचायत हद्दीत या टाक्‍या असल्याने त्यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून टाक्‍या पाडाव्यात असे निर्देश जिल्हा परिषदेने दिले होते. परंतू त्या आदेशानंतर त्या टाक्‍या पाडण्यात आल्या की नाही. याची पुन्हा विचारणा कोणीच केली नाही. या 49 टाक्‍यापैकी 9 टाक्‍या पाडण्यात आल्या आहेत. त्यात कर्जत तालुक्‍यातील कर्जत, राशीन. नगर तालुक्‍यातील विळद, चिंचोडी पाटील. पारनेर तालुक्‍यातील भाळवणी. पाथर्डी तालुक्‍यातील भालगाव. श्रीगोंद्यातील पिंपळगाव पिसा, घोगरगाव यासह नऊ टाक्‍या जमिदोस्त करण्यात आल्या आहेत.

उर्वरित 40 टाक्‍या मात्र अजूनही उभ्या आहेत. अकोले- गणोरे, पिंपरकणे. जामखेड- तेलंगशी, जवळा. कोपरगाव- वारी, थडी, मंजूर, करंजी.नगर- नेप्ती, भोरवाडी, खडकी. नेवासा- प्रवरासंगम, वरखेड. पारनेर- ढवळपुरी, पोखरी. पाथर्डी- माणिकदौंडी, रुपलाचातांडा, जांभळी, मुंगुसवाडे, एकनाथवाडी. राहाता- लोणी खुर्द, हनुमंतगाव, कोल्हार बुद्रूक, शिंगवे. राहुरी- उंबरे. संगमनेर- धांदरफळ. शेवगाव- एरंडगाव, शेवगाव, बालमटाकळी, कांबी, बोधेगाव, श्रीगोंदा- बेलवंडी बुद्रूक, लिंपणगाव, लिंपणगाव मुंढेवाडी, आढळगाव, तांदळी दुमाला, पेडगाव. श्रीरामपूर- टाकळीभान, बेलापूर बु.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)