कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागे करणार : उद्धव ठाकरे

राम मंदिर प्रकरणी न्यायालयाकडे बोट दाखवणे थांबवा

पंढरपूरमध्ये 24 डिसेंबरला जाहीर सभा

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवणे आता थांबवा, असा सल्ला देतानाच केंद्र सरकारमध्ये भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. हिंदुत्ववादी असलेल्या या सरकारला सत्तेवर येऊन साडेचार वर्षे झाली तरी राममंदिराबाबत जर काहीच होणार नसेल तर निवडणुकीत या विषयावर बोलण्याचा सरकारला अधिकार नाही. त्यामुळे राम मंदिरांच्या मुद्यावर कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागे करणार आहे, अशी टीका करीत त्यासाठी येत्या 24 डिसेंबरला पंढरपूर येथे मी सभा घेणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवसेना भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राममंदिर आणि दुष्काळाविषयीची शिवसेनेची भूमिका मांडली. 30 वर्षांनंतर एका पक्षाचं मजबूत सरकार, कॉंग्रेसेतर हिंदुत्ववादी सरकार आलेले आहे. असं सरकार आल्यानंतरसुद्धा जर राम मंदिर बांधले जात नसेल तर पुन्हा एकदा त्या मुद्‌द्‌यावरून प्रचार करण्याचा अधिकार या सरकारला नाही, अशी ठाम भूमिका घेत आता कोर्टाकडे बोट दाखवून शांत बसून चालणार नाही. जर इतर विषयात तुम्ही न्यायालयीन निर्णय फिरवत असाल तर हाही मुद्दा आता तुम्हाला कायदा करूनच सोडवावा लागेल. तो मुद्दा तुम्ही सोडवणार आहात की नाही. हे सांगा आणि त्यानंतरच प्रचाराला लागा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

अयोध्येला रामजन्मभूमीला दिलेली भेट हा पहिला टप्पा होता. यामुळे देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील हिंदूंच्या मनात मंदिरनिर्माणाची भावना जागृत झाल्याचेही ते म्हणाले. अयोध्येला जाऊन आलो आणि विषय सोडून दिला, असे मी करणार नाही. कारण आता पुन्हा निवडणुकीची वेळ आली आहे. रामायणातला कुंभकर्ण तरी सहा महिने झोपत होता. त्यामुळे राममंदिराच्या मुद्यावर वर्षानुवर्षे झोपलेल्या कुंभकर्णाला आता उठवायला हवं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)