भुयारी मेट्रोचे कामही रखडणार?

शनिवारवाडा, पाताळेश्‍वरसाठी लागणार “एनएमए’ची परवानगी

पुणे – मेट्रोच्या नगररस्त्यावरील कामाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने (नॅशनल मॉन्युमेंट ऍथॉरिटीने) परवानगी नाकारली. त्यात आता रेंजहिल्स ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर तसेच शनिवारावाड्याजवळून जात असल्याने प्राधिकरणाची या दोन्ही ठिकाणींसाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठीचा प्रस्ताव महामेट्रोने राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाला सादर केला आहे. दरम्यान, या दोन्ही पुरातत्त्व स्थळांसाठी परवानगी घेणे आवश्‍यक असतानाही महामेट्रोने त्याकडे दुर्लक्ष करत उशिराने हा प्रस्ताव दाखल केल्याने हे काम रखडण्याची भीती परिसर संस्थेने व्यक्त केली आहे.

आगाखान पॅलेसप्रमाणेच शनिवारवाडा व पाताळेश्‍वर ही दोन्ही राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहेत. त्या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात काम करण्यास बंदी आहे. तर 100 मीटरपासून पुढे 300 मीटर पर्यंत बांधकाम करायचे झाल्यास रेग्युलेटेड झोन (बांधकाम नियंत्रित क्षेत्र) म्हणून काही नियम व अटींच्या पूर्ततेनुसार, या भागात कामास परवानगी दिली जाते. शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग पूर्णत: भुयारी असला तरी, या मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर मंदीर आणि शनिवारवाडयाच्या परिसरात रेग्युलेटेड झोन मध्ये येतो. त्यामुळे काही अटी आणि मागदर्शक तत्वांची पूर्तता करून या भागात काम करता येत असले तरी, त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाची मान्यता लागते. त्यामुळे

महामेट्रोकडून प्राधिकरणासमोर या रेग्युलेटेड झोनमध्ये बांधकामासाठी परवानगी मागण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या दि.25 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हे दोन्ही विषय मंजुरीसाठी होते. मात्र, महामेट्रोने काही अहवालांची पूर्तता करण्याच्या सूचना प्राधिकरणाने केल्या आहेत. त्यात काही भूमिगत चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रीया पूर्ण होण्यास उशीर झाल्यास हे काम सुरू होण्यास लांबण्याची शक्‍यता परिसर संस्थेने व्यक्त केली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार, महामेट्रोला पुरातत्त्व परिणाम मूल्यांकन अहवाल, पर्यावरण तसेच सामाजिक परिणाम अहवाल, ध्वनीकंपण तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महामेट्रोने या दोन्ही संरक्षित स्मारकांच्या बांधकाम नियंत्रित झोनमध्ये काम करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यांना परवानगी मिळेलही, मात्र महामेट्रोकडून आगाखान पॅलेसबरोबरच या दोन्ही ठिकाणांसाठी अर्ज करणे आवश्‍यक होते. मात्र, महामेट्रोकडून या मान्यतांची गरज नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आता काम सुरू होण्याच्या तोंडावर अशा प्रकारे आयत्यावेळी मान्यतेचे प्रस्ताव पाठविल्याने त्याचा प्रकल्पाच्या कामावर तसेच खर्चावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
– रणजित गाडगीळ, परिसर संस्था.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)