मटक्‍याची पाळेमुळे उखडणार का?

जुगार-मटक्‍यांमुळे अनेकांचे संसार धुळीस : कारवाईत सातत्याची गरज

संदीप मोरे

रहिमतपूर –
रहिमतपूर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गांधी नगरमधून उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी धडक कारवाई करीत तीन जणांना अटक करुन साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे मटका बुकींच्यात खळबळ उडाली आहे. परंतु या कारवाईनंतर मटक्‍याची तसेच अवैध व्यवसायाची पाळेमुळे उखडण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांना पूर्ण करावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रहिमतपूर व परिसरात गेल्या अनेक वर्षापासून मटक्‍यासहीत गावोगाव देशी दारूचे गुत्ते , जुगाराचे अड्डे सुरू आहेत. अनेकांचे संसार दारु, मटक्‍यामुळे उघड्यावर आलेत. पण मिळणाऱ्या पैशाची झापड आल्यामुळे अवैध व्यवसायीकांना उघडे संसार दिसत नाहीत. या सर्वावर वचक ठेवण्याचे काम पोलिसांचे असते. पण कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कुणाकडे असा प्रकार होत आहे. आज अखेर रहिमतपूर पोलीस स्टेशनला अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आले. परंतु एकाही अधिकाऱ्याने एकही अवैध व्यवसाय बंद केला नाही.

फक्त यात्रा बंदोबस्त व वाहनांची तपासणी एवढेच काम पोलिसांना असते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बसस्थानक परिसरात मटका व्यवसाय चालत होता आणि रहिमतपूरच्या पोलीसांना माहित नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मग माहिती असेल तर एवढे दिवस त्याकडे सोयीस्कर डोळेझाक होत होती काय? कोरेगांवच्या उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी अवैध व्यवसाया विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.

दररोज अवैध व्यवसाय व त्यावर केलेली कारवाई याची बातमी येतच असते. परंतु, कोरेगाव पासून बारा किलोमीटर असलेल्या रहिमतपूरमध्ये पोलीस स्टेशन असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय चालत असेल याची खबर त्यांना मिळाली नसेल किंवा याची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोच होणारच नाही याची दक्षता घेतली असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कारवाई होण्यास एवढा वेळ झाला. परंतु झालेल्या कारवाईमुळे रहिमतपूर पोलिसांची नाचक्की झाली आहे.

उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी केलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य लोकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, एवढ्यावर न थांबता रहिमतपूर व परिसरातील ग्रामीण भागातील मटका, जुगार, देशी दारूचे अवैध व्यवसायाची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजेत. तरच हे व्यवसाय कायमचे बंद होतील व सर्वसामान्य लोकांचे संसार वाचतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)