मदन भोसले यांच्यासह वाईच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कवठे – वाई हे महाराष्ट्राचे वैभव असून वाई शहराच्या विकासाबाबत जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचा नक्कीच निपटारा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी वाईच्या भुयारी गटर व जलनि:सारण तथा एस. टी. पी. प्रक्रिया प्रकल्प याच्या एस. टी. पी. प्लॅनला जागेवरच मंजुरी देत सर्व विषयांना मंजुरी दिल्याने वाई शहरातील नागगिकांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. माजी आमदार तथा “किसन वीर’ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई नगरपालिकेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासक ग्वाहीमुळे वाईच्या नव्या विकासाचा अध्याय सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “वर्षा’ या निवासस्थानी मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्यासह नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मदन भोसले यांनी वाईचे विविध प्रश्न मांडले. त्यामध्ये सुमारे 42 कोटी रुपयांची मलनि:स्सारण योजना मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच या विषयाचा एस. टी. पी. प्लॅन केला आहे का याचीही विचारणा करुन या प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नाही याचीही ग्वाही दिली.
यावेळी सिद्धेश्वर मंदिरालगतचा रस्ता ते घोटवडेकर हॉस्पिटल लगतचा रस्ता जोडणारा नवा पूल व ऍप्रोच रस्ते, वाई शहराच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फुलेनगर येथे नवीन पूल उभारणे, सोनगिरवाडी येथे नविन भाजी मंडई व शॉपिंग सेंटर उभारणे, नगरपरिषद शाळा क्र. 4 साठी नवीन सर्व सुविधांनी सुसज्ज्य इमारत उभारणे यासह विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर लेखी निवेदनासह मांडण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांना जागेवरच मंजुरी देत वाईच्या विकासाला चालना देण्याबाबत कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळी मदन भोसले यांनी कंदी पेढे, शॉल, बुके, आंबे देवून मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी वाई शहर भाजपा अध्यक्ष अजित वनारसे, शेखर शिंदे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, डॉ. सुरभी भोसले, अनिल जाधव, नगरसेवक सतिश वैराट, महेंद्र धनवे, सुमैय्या इनामदार, रुपाली वनारसे, वासंती ढेकाणे यांच्यासह विजय ढेकाणे, अमजद इमानदार आदी उपस्थित होते.