शिवसेना गड राखेल?

परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. इथे सतत पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. शिवसेनेचे सध्याचे खासदार संजय जाधव हेच आताही शिवसेनेचे उमेदवार असून ते 2014 ची पुनरावृत्ती करतील असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर हे रिंगणात उतरले आहेत.

परभणी मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील दोन जालना जिल्ह्यात आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघही गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहेत. परतूर, घनसावंगी, परभणी, गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहेत. यातील परतूर आणि घनसावंगी हे जालना जिल्ह्यात आहेत. मात्र या सहापैकी केवळ एकाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे.

आतापर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघाकडे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच पाहिले जात होते. पण यावेळी शिवसेनेला इथली निवडणूक आव्हानात्मक ठरेल अशी चिन्हे आहेत. गेल्या 25 वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात विभागल्या जाणाऱ्या मतांचा फायदा शिवसेनेला मिळत होता. पण यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आहेत. आणि शिवसेनेला अंतर्गत वादाने गांजले आहे. परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचा संजय जाधव यांना विरोध आहे. याशिवाय गंगाखेड येथील माजी उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे.

भाजप-शिवसेना युती झाली नसती तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना साकोरे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होत्या. पण आता युती झाली आहे, आणि परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या नेत्यांना आता निवडणूक लढण्याची इथे संधी नाही. त्यामुळे मेघना साकोरे नाराज आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या प्रचारात कितपत सहभागी होतात हा प्रश्‍नच आहे.

मात्र संजय जाधव यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वत:च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रचाराला धुमधडाक्‍यात सुरुवात केली आहे. युतीचा फायदा त्यांना होईल, पण भाजप नेत्यांबरोबरही त्यांचे फारसे सख्य नाही. गेल्या साडेचार वर्षांतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वितुष्ट निवडणुकीच्या तोंडावर लगेच संपेल असे वाटत नाही. या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यात एकमेकांविषयी विश्‍वास निर्माण होण्याची गरज आहे. संजय जाधव यांना आपल्याबरोबर शिवसेना आणि भाजप दोन्हींच्या कार्यकर्त्यांना बरोबर नेण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. पण आजपर्यंत राष्ट्रवादीला येथे यश मिळालेले नाही. मागच्या निवडणुकीत विजय भांबळे अगदी थोड्या मतांनी हरले होते. याहीवेळी त्यांनी निवडणूक लढवावी असा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत होता, पण त्यांनी नकार दिला. तेव्हा आता राजेश विटेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. विटेकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. यावेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर आहे. पण इतरांना मदत करण्याची सवय नसलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रचार करवून घेण्याचे आव्हान विटेकर यांना पेलावे लागणार आहे.

इथेही जाधव विरूद्ध विटेकर अशी दुरंगी लढतच प्रामुख्याने होणार आहे. पण या निवडणुकीत खरे आव्हान आहे ते मेघना साकोरे यांचे. कारण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास त्या अतिशय उत्सुक होत्या. त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे कॉंग्रेसचे माजी आमदार. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या कन्या मेघना साकोरे याही भाजपत गेल्या. तेव्हापासून त्या परभणी लोकसभा मतदारसंघात काम करत आहेत. त्यांचे दीपस्तंभ प्रतिष्ठान नावाचे एक प्रतिष्ठान आहे. त्यामार्फत त्यांनी या मतदारसंघांतील 1300 पैकी 1100 गावांत जाऊन प्रचार केला आहे. आता संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने साहजिकच त्या नाराज झाल्या आहेत. रामप्रसाद बोर्डीकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मेघना राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत हेही सांगितले. पण त्याचा काही परिणाम होण्याची शक्‍यता नाही. कारण युतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी त्याचा उपयोग होणार नाही. याचे भान भाजपच्या स्थानिक नेत्यांना जितके लवकर येईल तेवढा युतीला फायदा जास्त होईल.

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या समस्या अतिशय गंभीर आहेत. वास्तविक पाहता परभणी जिल्हा सुपीक जमिनीचा आहे. गोदावरी, दुधना, करपरा आणि पूर्णासारख्या चार नद्या येथे वाहतात. रेल्वेचे मोठे जाळेही इथे आहे. पण तरीही शेतीवर आधारित एकही उद्योग येथे उभा राहिलेला नाही. शेतकरी आत्महत्या, शिक्षण क्षेत्राची दुरवस्था, बेरोजगारी, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य समस्या अशा अनेक समस्या इथे आहेत. पण या समस्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. भावनिक मुद्द्यांवरच येथे निवडणुका लढवल्या जातात.

गेल्या निवडणुकीत संजय जाधव यांना पाच लाखांहून अधिक मते मिळाली होती. भांबळे यांचा त्यांनी एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती होणार की राष्ट्रवादीच्या बाजूने कौल लागणार हे संजय जाधव आपल्या पक्षातील कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांना आपल्याबरोबर आणण्यात किती यशस्वी होतात यावर अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)