रॉबर्ट वढेरा होणार राजकारणात सक्रिय?

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी जनसेवेसाठी व्यापक भूमिका निभावण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे वढेरा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भ्रष्टाचार आणि मनी लॉण्डरिंगच्या आरोपांवरून वढेरा सध्या ईडीसारख्या यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, आपल्याविरोधातील प्रकरणांची प्रक्रिया संपल्यानंतर व्यापक कार्य करण्याचा मानस वढेरा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून व्यक्त केला. मी मागील अनेक वर्षे देशाच्या विविध भागांत आणि विशेषत: उत्तरप्रदेशात प्रचार आणि इतर कार्य केले. तो अनुभव आणि शिक्षण वाया जाऊ न देता त्याचा अधिक चांगला उपयोग व्हावा असे मला वाटते. माझ्यावरील आरोपांचा ससेमिरा थांबल्यानंतर जनसेवेसाठी आणखी व्यापक कार्य करावे अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले. विविध सरकारांनी माझी प्रतिमा मलिन केली. देशातील खऱ्या मुद्‌द्‌यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या नावाचा वापर करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, वढेरा यांनी राजकारण प्रवेशासंदर्भात दिलेल्या संकेतांविषयी पत्रकारांनी कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना छेडले. त्यावर जनतेशी निगडीत कार्य करण्यासाठी वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घ्यायची का, असा प्रतिप्रश्‍न खेरा यांनी केला. वढेरा प्रदीर्घ काळापासून स्वयंसेवी संघटनांसमवेत समाजासाठी कार्य करत आहेत. जनसेवेसाठी योगदान देणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तर भाजपने वढेरा यांच्या इच्छेची खिल्ली उडवली. आगामी लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अशा उपहासात्मक शब्दांत भाजपने वढेरा यांचा उल्लेख केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)