व्हेनेझुएलाकडून क्रुड न घेण्याची अमेरिकेची भारताला सूचना
नवी दिल्ली – व्हेनेझुएला येथील सत्तासंघर्षाचा परिणाम आता भारतावरही होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या राजवटीकडून कच्चे तेल खरेदी न करण्याची सूचना अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पियो यांनी भारताला केली आहे. भारताचे विदेश सचिव विजय गोखले यांच्यासोबतच्या संयुक्त बैठकीनंतर पॉम्पियो यांनी याबद्दल विधान केले आहे.
भारत याप्रकरणी अमेरिकेच्या धोरणाचे समर्थन करेल, अशी अपेक्षा असल्याचे पॉम्पियो म्हणाले. व्हेनेझुएलाचे विद्यमान अध्यक्ष मादुरो यांच्याऐवजी अंतरिम अध्यक्ष जुआन गुएडो यांना अमेरिकेने पाठिंबा दर्शविला आहे. भारतीय विदेश सचिवांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. इराणप्रकरणी आमच्या प्रयत्नांना भारताचे समर्थन प्राप्त आहे. अशाचप्रकारे व्हेनेझुएलातील संकटावर अमेरिकेच्या धोरणाला भारत पाठिंबा देईल, असा विश्वास आहे.
व्हेनेझुएलाच्या राजकीय संकटाच्या स्थितीसह तेथील मानवी संकट भारत विचारात घेईल, अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष निकोलस मादुरो यांना समर्थन म्हणजे अवैध सत्तेची पाठराखण असल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले आहे. काही देश मादुरो यांना शस्त्रांचा पुरवठा करत आहेत. काही विदेशी संस्था मादुरो आणि त्यांच्या सहकाऱयांना अवैध सुविधा प्रदान करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
व्हेनेझुएलाच्या सत्तासंघर्षात मादुरो यांना रशिया आणि चीनचे समर्थन प्राप्त आहे. तर गुएडो यांना अमेरिकेसह अनेक दक्षिण अमेरिकेच्या देशांचा पाठिंबा मिळाला आहे.