खडसेंना शिवसेनेची साथ मिळेल?

– विदुला देशपांडे

रावेर लोकसभा मतदारसंघ नवा आहे. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. रावेर लोकसभा मतदारसंघाला केवळ 2009 आणि 2014 या दोनच लोकसभांचा अनुभव आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाच आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर हे पाच विधानसभा मतदारसंघ तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा या मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. या मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून आले आहेत. 2009 मध्ये हरिभाऊ जावळे तर 2014 मध्ये रक्षा खडसे या मतदारसंघातून निवडून आल्या. याही वेळी रक्षा खडसे यांनाच भाजपची उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रक्षा खडसे या स्नुषा आहेत. एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते असले तरी सध्या ते नाराज आहेत. आपण बाजूला पडलो असल्याची खंत अनेकदा त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून दिसून येते. पण तरीही भाजपवरची त्यांची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही की खानदेशातील राजकारणावरची आपली पकड त्यांनी आजिबात सैल केलेली नाही. या भागात भाजप रुजवायला आणि फोफावायला खडसेंची मेहनत सर्वाधिक कारणीभूत आहे. गेल्या तीन दशकांपासून खडसेंचा या भागावर प्रभाव आहे.

अर्थात इथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनाही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे या नावाभोवती एक मोठे वलय आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर या भागात भाजपला सुरूंग लागतो की काय असे वाटत होते. विरोधकांनी तसे प्रयत्नही केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. या लोकसभा मतदारसंघातील जनता खडसे यांच्यामागे ठामपणे उभी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप तळागळापर्यंत पोचला आहे.

रक्षा खडसे एकनाथ खडसे यांचाच वारसा पुढे चालवत आहेत. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. शिवाय त्यांचे काम नियोजनबद्ध असते, तसाच प्रचारही नियोजनबद्ध असतो. त्याचा चांगला परिणाम याही वेळी दिसून येईल, असा विश्‍वास भाजपला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपला विरोधकांपेक्षा शिवसेनेचीच जास्त चिंता आहे. कारण हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी शिवसैनिकांची इच्छा होती. शिवाय खडसे आणि शिवसेनेचे फारसे पटत नाही. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते रक्षा खडसेंचा प्रचार करणार की नाही असा प्रश्‍न उभा राहिला आहे. अर्थात युतीचा धर्म भाजप आणि शिवसेना दोघांनाही पाळावा लागणार आहे.

वास्तविक पाहता एकनाथ खडसे यांची या लोकसभा मतदारसंघावर एवढी मोठी पकड आहे की कुणाच्याही मदतीची, अगदी भाजपातीलही कुणाच्या मदतीची एकनाथ खडसेंना गरज नाही अशी परिस्थिती आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी शिवसेनेची रक्षा खडसेंना किती मदत मिळेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते.

भाजपतील एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे गटातटाचे राजकारण, शिवसेना आणि खडसे यांच्यातील धुसफूस, शिवसेनेची खडसेंवरील नाराजी या सगळ्याचा विरोधक कसा फायदा घेतात यावर त्यांचे यश अवलंबून आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक समस्याही आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा ते जामनेरपर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. या तालुक्‍याला लागून सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. पावसाळ्यात या डोंगरांवरून वाहणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. पण आतापर्यंत केवळ सर्वेक्षण झाले आहे. प्रकल्पाचे काम कणभरही पुढे सरकलेले नाही. रावेर परिसरात केळीचे मुख्य उत्पादन आहे. त्यामुळे इथे पाण्याची जास्त आवश्‍यकता आहे.

केळीच्या लागवडीसाठी भूगर्भातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होतो आणि मग पाणीटंचाई निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना हवी आहे. पाणी अडवण्यासाठी अनेक योजना जाहीर झाल्यात पण काम कुठेच पुढे सरकताना दिसत नाहीत. रक्षा खडसे यांचा कामाचा झपाटा चांगला आहे. अनेक विकासकामे त्यांनी केलीही आहेत. पण पाणीटंचाई दूर करण्यासाठी योजनांचा पाठपुरावा त्यांच्याकडून म्हणावा तसा झाला नाही असा आरोप होत आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. इतर कोणत्याही मुद्यांपेक्षा यावेळी वैचारिक मुद्यांवर जास्त भर देण्यात येतोय. संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने त्याची गरजही आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे पारडे जड वाटत असले तरी विरोधकांनी जर आपली ताकद एकवटली तर भाजपपुढे आव्हान उभे राहू शकते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनीष जैन यांचा रक्षा खडसे यांनी जवळपास तीन लाखांच्या मताधिक्‍याने पराभव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)