मी वाराणसीतून निवडणूक लढवू का? – प्रियांका गांधींचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सवाल

रायबरेली – मी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवू का? असा प्रश्न कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना रायबरेली येथील एका बैठकीत विचारला आहे. त्याला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे प्रियांका या मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

यंदा पहिल्यांदाच प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा त्यांनी केली. या यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत; तर सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवतील. प्रियांका गांधींनी यंदा निवडणूक लढवावी अशी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात कॉंग्रेस आणि सपा-बसपा आघाडीने अजून उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळेच प्रियांका कॉंग्रेसतर्फे इथून मोदींना आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, प्रियांका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवल्यास मोदी वाराणसी मतदारसंघातच अडकतील आणि त्यांना इतर ठिकाणी प्रचारासाठी अधिक वेळ देता येणार नाही. तसेच प्रियांकांइतके तगडे आव्हान मोदींना कोणीच देऊ शकत नाही, असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)