समविचारी पक्षांना घेऊन लोकसभेसाठी सक्षम पर्याय देवू : जयंत पाटील

शिवसेना-भाजपचा पराभव करण्याचे उद्दिष्ट 
मुंबई: कॉंग्रेस पक्षात आणि आमच्यामध्ये कोणतेही अंतर नाही. दोन्ही पक्षांचे विचार योग्य दिशेने चालू आहेत. समविचारी पक्षांमध्ये जे पक्ष बसतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. त्या चर्चा सुरु आहेत आणि मला खात्री आहे की, समविचारी पक्षांना घेवून एक सक्षम असा पर्याय आम्ही महाराष्ट्रात लोकसभेला देवू, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर गेले दोन दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या कामकाजाचा आढावा सुरु केला आहे. आज या आढावा बैठका संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
लोकसभेच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला जिथे जागा लढवण्यासाठी जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत चाचपणी करण्यात आली. त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघापासून ते यवतमाळ मतदारसंघापर्यंत ज्याठिकाणी आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शक्ती आहे तिथल्या कार्यकर्त्यांना बोलावून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे यथायोग्य मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी की नाही याबाबत निर्णय होईल.
या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, विजयसिंह मोहिते-पाटील, अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार राजेश टोपे, आमदार हसन मुश्रीफ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार जयदत्त क्षीरसागर आदी नेते उपस्थित होते.
मनसेबाबत चर्चा नाही 
मनसेच्याबाबतीत कोणतीही चर्चा आम्ही कुणीच केलेली नाही. मिडीयामधूनच या बातम्या पुढे आल्या आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले. आज मुंबईचीही बैठक झाली. त्यामध्ये मुंबईत लोकसभेसाठी एका जागेऐवजी आणखी एक जागा मागा अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्याचे पाटील यांनी सांगितले. पुणे शहरातील कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आले होते. शेवटी शक्‍यशक्‍यतेचा विचार करुन सर्वजण निवडणूकीमध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेवून या मतदारसंघातील सगळयांशी चर्चा करण्यात आली. कुठल्या जागा मागणार किंवा देणार हा प्रश्न आज उपस्थित झाला नाही. आज आम्ही जो आढावा घेतला त्या अनुषंगाने कॉंग्रेस पक्षाशी चर्चा करणार आहोत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)