काँग्रेस पुनरागमन करणार कि…?

नंदूरबार लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात 67 टक्‍के आदिवासींची लोकसंख्या आहे. 2009 पर्यंत हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या मतदारसंघातून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करत असत. याही वेळी प्रियांका गांधींना प्रचारासाठी बोलावण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे. 2014 मध्ये गमावलेला हा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेस पुन्हा मिळवेल का हा खरा प्रश्‍न आहे.

नंदूरबार लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांच्या अनुक्रमातील पहिला मतदारसंघ. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून 2009 पर्यंत सतत नऊवेळा कॉंग्रेसचे माणिकराव गावित लोकसभा निवडणूक जिंकत होते. 2014 ला मात्र हा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या हातून निसटला आणि भाजपला मिळाला. भाजपच्या डॉ. हिना गावित या लोकसभा मतदारसंघातून त्यावेळी निवडून आल्या आणि याहीवेळी त्याच भाजपच्या इथल्या उमेदवार आहेत.

नंदूरबार लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हे सहाही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. सहा विधानसभा मतदारसंघातील चार नंदूरबार जिल्ह्यातील आहेत तर दोन धुळे जिल्ह्यातील आहेत. 2009 पासून या जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात संघर्ष होता. त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपली कन्या डॉ. हिना गावित यांना भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरवले. त्यावेळी कॉंग्रेसबद्दलची नाराजी आणि नरेंद्र मोदी लाट यामुळे हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. पण आता यावेळी डॉ. हिना गावित आपल्याकडे हा मतदारसंघ राखतात की कॉंग्रेसचे कमबॅक होते याची उत्कंठा सर्वांनाच आहे.

खरे तर नंदूरबार जिल्हा सुरुवातीपासून कॉंग्रेसचाच बालेकिल्ला आहे. कॉंग्रेससाठी हा मतदारसंघ हक्‍काचा मतदारसंघ म्हणावा असा होता. कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कॉंग्रेस या मतदारसंघातून करत असे. कॉंग्रेसचे माणिकराव गावित यांनी 42 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय झाल्यावर या मतदारसंघात कॉंग्रेसला प्रतिस्पर्धी आला. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जो काही प्रभाव निर्माण केला होता, त्याचा फायदा कॉंग्रेसलाच झाला. आघाडी सरकार असताना त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या माध्यमातून आदिवासी भागांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे जाळे निर्माण केले. 2014 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे गेला तेव्हा डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपली कन्या डॉ. हिना गावित यांना खासदार केले. नंदूरबार जिल्ह्यात वास्तविक पाहता भाजपचे कार्यकर्ते नव्हते किंवा गाव पातळीवर काम करणारेही कुणी नव्हते. अशा वेळी गावितांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजपला विजय मिळवून दिला. त्यामुळे 2014 च्या विजयाचे एक कारण मोदी लाट हे असले तरी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात एवढा मोठा विजय संपादन करणे सोपे नव्हते. ते गावितांनी करून दाखवले. विजयकुमार गावितांचे हे महत्त्व भाजप जाणून आहे. म्हणूनच यावेळी डॉ. हिना गावित यांनाच भाजपने उमेदवारी दिली याचे कुणाला फारसे आश्‍चर्य वाटलेले नाही.

पण यावेळी लोकसभा निवडणूक जिंकणे डॉ. हिना गावित यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. याचे कारण म्हणजे नंदूरबार जिल्ह्यातील कॉंग्रेसचा प्रभाव संपूर्णतया कमी करण्यात डॉ. हिना गावित यांना यश आलेले नाही. मुळात भाजप या मतदारसंघात कमकुवत आहे. जे काही काम भाजपचे या मतदासंघात उभे आहे ते रा. स्व. संघ आणि डॉ. विजयकुमार गावित यांच्यामुळे. गेल्या पाच वर्षांत हिना गावित यांनी ग्रामीण भागात मोठे काम केले आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्यांनी देशात सर्वात जास्त गॅस सिलिंडर आणि दूरसंचार सुविधा येथील जनतेला मिळवून दिल्या आहेत. त्याचबरोबर रस्ते बांधणीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या वडिलांचा समर्थक वर्ग मोठा आहे. डॉ. विजयकुमार गावित कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे समर्थक त्यांचे निष्ठावान आहेत आणि ते गावितांबरोबरच असतात.

नंदूरबारच्या खासदार भाजपच्या असल्या तरी नंदूरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेत कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. नंदूरबारमधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे तर दोनमध्ये भाजपचे आमदार आहेत. विधानपरिषदेतही कॉंग्रेसचेच आमदार आहे. नंदूरबार जिल्हा परिषद कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. तर नंदूरबार, शिरपूर, साक्री, नवापूर, अक्राणी (धडगाव) या नगरपालिकांवर कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. शहादा नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा असला तरी पालिकेत बहुमत कॉंग्रेसकडे आहे. तळोदा नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. थोडक्‍यात, या मतदारसंघात कॉंग्रेसची स्थिती मजबूत आहे.

इथे भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. डॉ. गावित यांच्यामुळे अनेक भागात भाजपचे प्राबल्य वाढले आहे. पण नंदूरबारमध्ये गावितांच्या घरातील कलहाचा फटका भाजपला बसतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. डॉ. विजयकुमार गावित यांचे दोन भाऊ शरद गावित आणि राजेंद्र गावित हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे हिना गावित यांना हे आव्हान पेलावे लागणार आहे.

भाजपमध्येही जुने आणि नवे असे दोन गट पडलेले आहेत. डॉ. गावित यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य भाजपत आले. त्यामुळे जुने कार्यकर्ते जरा बाजूला पडले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांचे कामही प्रचंड आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना गावितांबद्दल ममत्व नसले तरी त्यांना विरोध करण्याचे धाडसही त्यांच्यात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)