इंदिरा गांधींप्रमाणे मोदींना श्रेय का दिले जाऊ नये? – राजनाथ

अहमदाबाद – पाकिस्तानचे विभाजन करून बांगलादेश मुक्त केल्याचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिले गेले. मग, बालाकोट हवाई हल्ल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का दिले जाऊ नये, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी विरोधकांना उद्देशून विचारला.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या समर्थनार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेत राजनाथ बोलत होते. भारतीय सुरक्षा दलांनी शौर्य गाजवून पाकिस्तानचे दोन भागांत विभाजन केले. त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली. त्या युद्धानंतर देशभरात इंदिरा गांधी यांची प्रशंसा झाली. त्यावेळी संसदेत आमचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांचे कौतुक केले.

मोदींनीही सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यावर आपल्या सुरक्षा दलांना मोकळीक दिली. त्यामुळे 1971 मध्ये पाकिस्तानचे विभाजन करण्याचे श्रेय इंदिरा गांधी यांना दिले जाऊ शकते. तर बालाकोटबद्दल मोदींना श्रेय का दिले जाऊ शकत नाही, अशी विचारणा राजनाथ यांनी केली. जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात मागील महिन्यात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करून भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैशचा अड्डा उद्धवस्त केला. त्या हवाई हल्ल्याचे श्रेय घेत असल्याबद्दल विरोधकांकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. त्या टीकेचा राजनाथ यांनी समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)