…तर मला अटक का केली जात नाही? दिग्विजय सिंह यांचा सवाल

पुणे -“राज्यसभा सदस्य आणि माजी मुख्यमंत्री असल्यामुळे माझा मोबाइल क्रमांक वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाच्या डायरीत माझा मोबाइल क्रमांक लिहिलेला असेल, तर मी दोषी कसा असेल? माझे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याची चर्चा केली जाते. तसे असेल, तर मला अटक का केली जात नाही? असे प्रश्‍न कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.

दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त दिग्विजयसिंह यांनी पंढरपूर येथे शुक्रवारी पहाटे विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे कॉंग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेत विविध विषय मांडले. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, नगरसेविका सुजाता शेट्टी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, सदानंद शेट्टी, सचिन तावरे उपस्थित होते.

दिग्विजयसिंह म्हणाले, “आम्ही जनतेच्या निर्णयाचा सन्मान करतो, मात्र 60 कोटी मतदार असलेल्या देशात निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळणार, यासंदर्भातील त्यांच्या नेत्यांची भविष्यवाणी आश्‍चर्यकारक पद्धतीने खरी ठरत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. नुकतेच सादर झालेले केंद्राचे अंदाजपत्रक आणि आर्थिक सर्व्हेक्षण यामध्ये मोठी तफावत आहे. खोटे आकडे प्रसिद्ध करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. बेरोजगार समस्येचा अर्थसंकल्पात उल्लेख नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्ने विकण्यात माहिर आहेत. त्यांनी 2014 च्या निवडणुकीत दाखवलेली स्वप्ने फसवी निघाली,’ असाही आरोप दिग्विजयसिंह यांनी यावेळी केला. “पुलवामा हल्ल्यात साडेतीन क्विंटल स्फोटके होती, हे सरकारला कसे माहिती? हल्ल्याची पूर्वसूचना होती, तर जवानांना पाठवून जोखीम का उचलली? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित करत, त्यावर मोदी यांनी कोणत्याही मंत्र्याला जबाबदार धरले नाही. मात्र, आम्ही काही विचारले तर आम्हाला देशद्रोही ठरवले जाते,’ असेही दिग्विजयसिंह म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)