शेअर विक्री करण्याचा निर्णय अवघड का वाटतो ?

शेअर घेणे हे जेवढे सोपे असते, तेवढे विकणे नाही, पण फायदा पदरात पाडून घेण्यासाठी शेअर तर विकलाच पाहिजे. तो कधी विकावा, हा मात्र मोठाच पेच असतो.

चतुर
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची एक समस्या असते ती म्हणजे स्वतःच्या खात्यामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर, बॉन्डस्‌ आणि म्युच्युअल फंड घेऊन ठेवलेले असतात. अनेकदा ही खरेदी करत असताना आपण दृढ विश्वासाने केलेली नसते. कुणीतरी दिलेली टिप, फोनवर आलेले भ्रमित करणारे फेक मेसेज, किंवा आपला
स्वतःचा अंदाज बांधून आपण ही खरेदी केलेली असते. अशा खरेदीची विक्री केव्हा करायची हा निर्णय आपल्याला घेता येत नाही. अनेकदा विक्री करण्याचा निर्णय आपल्यासाठी खूप कठीण असतो. घेताना आपण शेअर बाजारातील कुठल्याही कंपनीचा शेअर घेऊ शकतो आणि विकताना मात्र आपल्याकडे असलेल्या शेअरची विक्री करण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. पुन्हा आपण बरेच दिवस वाट पाहतो आणि मग कंटाळून एके दिवशी आपल्याकडील एका कंपनीचे शेअर विकून टाकतो आणि मग आठवडाभरातच त्या कंपनीचा शेअर वरच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसू लागतो. त्यामुळे विक्री नेमकी केव्हा करायची हा प्रश्न नेहमीच गुंतवणूकदाराला गोंधळात  टाकतो.

पहिल्यांदा आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्यांचे शेअर आहेत त्या कंपन्यांचे मूल्यमापन केले पाहिजे. वर्षातून एकदा तरी या कंपन्यांची वर्षभरातील कामगिरी, ताळेबंद, भविष्यातील वाटचाल याबाबत विचार केला पाहिजे. मग हा शेअर अजून काही वर्षे ठेवायचा की विकायचा किंवा त्यात सध्याच्या किमतील आणखी काही शेअर खरेदी करायचे हे ठरवता येते. मग या शेअरची सध्याच्या किंमतील मित्राला शिफारस करावी का असाही विचार मनात येतो. या प्रश्नांची उत्तरे ठामपणे होकारात्मक नसतील तर त्या शेअरमधील तुमची गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्याचे स्पष्ट होते. कारण त्या कंपनीची मुळातच गुणवत्ता आणि कामगिरी तुलनेत कमी असल्याने किंवा घसरत असल्याने अशा कंपनीचे शेअर विकून टाकण्याचा निर्णय घेणे श्रेयस्कर ठरते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या किमतील शेअर किंवा म्युच्युअल फंड खरेदी केला आहे त्यापेक्षा त्याची आता किंमत कमी झालेली असते म्हणून तो विकण्याची आपली तयारी नसते. हा एक मानसिक सापळा असतो. शेअरची किंमत ती कंपनी किती भक्कम पायावर उभी आहे यावरून आणि बाजारातील अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे रोज खालीवर होत असते. आपल्या डोक्‍यात मात्र आपण ज्या किमतील शेअर खरेदी केले तीच किंमत कोरली गेलेली असते. आपल्यासाठी ती संवेदनशील पातळी असते, पण बाजारात आणि अन्य कुणाच्याही डोक्‍यात त्या कंपनीच्या शेअरच्या भावाविषयी अशी कल्पना नसते. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेल्या पातळीशी कुणलाही काहीही देणेघेणे नसते. पोर्टफोलिओतील आपल्या गुंतवणुकीचे मूल्यमापन करून विक्रीचा किंवा होल्ड करण्याचा निर्णय घेता येतो. पुन्हा तुमच्या पोर्टफोलिओतील प्रत्येक कंपनीचे शेअर तुम्हांला फायदाच मिळवून देतील असे नव्हे. तुमच्या काही निर्णयांमुळे तोटाही सहन करावा लागू शकतो.
काहीवेळा शेअर खरेदी केल्यावर तो किती वर जाणार याचे उद्दिष्ट आपण मनात ठरवलेले असते. ते उद्दिष्ट साध्य झाले की शेअर विकायचे हे ठरलेले असते. अनेक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक दुपप्ट झाली की स्टॉक विकायचा हा सर्वसाधारण नियम असतो. पण विकल्यानंतर काय करणार असा प्रश्न असतो. मुळात गुंतवणूकदार म्हणून आपण काही कारणांसाठी हे उद्दिष्ट ठरवलेले असते. म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कार खरेदी, निवृत्तीनंतरची व्यवस्था त्यामुळे स्टॉकची विक्री टार्गेटपेक्षा अशा कारणांशी जोडलेली असावी.

प्रॉफिट बुक करणे या शब्दांच्या घोळातही काही गुंतवणूकदार अडकलेले असतात. त्यांना असे वाटत असते की, आता स्टॉकच्या किंमतीत करेक्‍शन येणार आहे त्यामुळे काही शेअर विकून प्रॉफिट बुक करणे शहाणपणाचे ठरेल. चांगली कामगिरी करणाऱ्या शेअरचा भाव वधारण्याच्या पूर्ण क्षमतेचा फायदा प्रॉफिट बुकिंगमध्ये मिळत नाही. पुन्हा करेक्‍शनची नेमकी वेळ प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रत्येक वेळी सापडतेच असे नाही. त्यामुळे पोर्टफोलिओमधील प्रत्येक स्टॉकचे पोर्टफोलिओच्या एकूण वाढीत किती योगदान आहे याचा विचार करून विक्रीचा निर्णय घेता येईल.

पुन्हा प्रत्येकवेळी विक्री करण्याच्या निर्णयाला एक भावनिक किनार असते. नंतर खेद करत बसण्यापेक्षा हाती गवसला आहे तेवढा प्रॉफिट बुक करण्यासाठी आपले प्राधान्य असते. चांगली कामगिरी करणाऱ्या कंपनीचे शेअर आपण विकतो आणि नफा कमावल्याचा आनंद घेतो. असे करताना आपण बहुतेकवेळा चांगली कामगिरी करणारे शेअर पोर्टफोलिओमधून कमी करतो आणि भाव घसरत असलेले शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये तसेच राहतात. त्यामागे तोट्यापेक्षा प्रॉफिट बुक करण्याचा आनंद दडलेला असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)