शशी थरूर यांचे तथ्यहीन भाकित कशासाठी?

राहुल गोखले
एकीकडे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सौम्य हिंदुत्वाचा मार्ग अवलंबित असताना माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी ” भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास भारताचे रूपांतर हिंदू पाकिस्तान’मध्ये होईल इतके पातळीहीन विधान करावे हे म्हणूनच आश्‍चर्यकारक आहेच; तर दुसरीकडे त्यांच्या उद्देशावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारेही आहे.

कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि वादग्रस्तता हे समीकरणच आहे. यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने करून त्यांनी वादंग निर्माण केले होते. तथापि, आता त्यांनी जे ताजे विधान केले आहे, ते अतिशय आक्षेपार्ह आणि; खरे तर निंदेस पात्र आहे. राजकीय विरोध करताना देखील संयतपणा आणि सभ्यता राहिली पाहिजे, याचे तारतम्य अलीकडे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये दुर्मिळ होत चालले आहे; आणि थरूर आपण अशांमध्ये मेरुमणी ठरू, अशाच इर्षेने विधाने करीत सुटले आहेत.

“सन 2019 च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा विजयी झाला, तर तो पक्ष राज्यघटनेचे पुनर्लेखन करील, आणि “भारताचे रूपांतर हिंदू पाकिस्तान’मध्ये करेल’, असे अतिशय बेजबाबदारपणाचे विधान करून थरूर यांनी खळबळ उडवून दिली आहे. अर्थातच भाजपने याचा समाचार घेतला आहेच; परंतु एकीकडे अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या आरोपातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या कॉंग्रेसनेदेखील थरूर यांना कानपिचक्‍या दिल्या आहेत. मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांमुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई कॉंग्रेसने केली होती. आता थरूर यांनी केलेले विधान तेवढेच धक्‍कादायक असल्याने कॉंग्रेस थरूर यांच्यावर कारवाई करणार का, हा प्रश्‍न अप्रस्तुत ठरणार नाही.

राजकीय क्षेत्रात जिभेवरील नियंत्रण सुटण्याचे चिंताजनक प्रसंग अलीकडे वाढत चालले आहेत आणि कोणताच पक्ष यास अपवाद नाही. भाजपचे काही नेते तारतम्य सोडून विधाने करतात आणि मुख्य म्हणजे देशभक्तीचे ठेकेदार असल्याचा आव आणून विरोधकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. तेव्हा एकूणच सभ्यता लयाला चालली आहे आणि ज्यांच्यावर वास्तविक सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे; तेच वातावरण दूषित करण्यात अग्रभागी आहेत हे आणखी चिंताजनक. तथापि थरूर यांचे ताजे विधान हे कदाचित त्या सगळ्यावर कडी करणारे ठरावे. भाजप सत्तेत पुन्हा आला तर भारताचा हिंदू पाकिस्तान होईल या विधानाकडे गांभीर्याने पाहावयास हवे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा जरी भारताचा इतिहास पाहिला तर भारत धर्मांध झाल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही.

कॉंग्रेसने अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण केले असा आरोप कॉंग्रेसवर होतो आणि शहा बानो प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण. दुसरीकडे भाजपवर कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याचा आरोप होतो. बाबरीचे पतन किंवा गोध्रानंतर गुजरातेत उसळलेल्या दंगलीकडे अंगुलीनिर्देश करून भाजपला अल्पसंख्याकांच्या विरोधात काम करायचे आहे, असा दावा विरोधक करतात. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांचे हत्याकांड झाले हाही धर्मांधतेचा दाखला आहे आणि पंजाबात 1980 च्या दशकात उफाळलेला दहशतवाद हा देखील अतिरेकी धार्मिकतेचा दाखला.
परंतु या सगळ्या काळात देशात आणि विविध राज्यांत कॉंग्रेस सत्तेत होती किंवा भाजप सत्तेत होता. तेव्हा वेळोवेळी झालेल्या धार्मिक दंगली पेटण्याचे कारण हे केवळ सत्तेत कुठला विशिष्ट पक्ष होता असे मानता येणार नाही.

समाजातील धार्मिक तिढ्याचे रूपांतर धार्मिक तेढीत होते आणि मग समाजकंटक त्याचा विकृत लाभ उठवितात. जातीय दंगलीदेखील भारतात असंख्य झालेल्या आहेत आणि त्याचे खापर देखील कोणत्या एका पक्षावर फोडता येणार नाही. परंतु त्यापेक्षाही हे महत्त्वाचे की भारतीय जनता अशा धार्मिक अतिरेकाला कधी बळी पडलेली नाही. पाकिस्तानची निर्मिती हीच मुळी धर्मावर आधारित होती; तर भारताने स्वातंत्र्यापासून धर्मनिरपेक्षतेची कास धरली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी हिंदूराष्ट्राचे स्वप्न पाहिले असले तरी त्याचा अर्थ हिंदू पाकिस्तान’ निर्मिती करणे असा अभिप्रेत असू शकतो यावर सामान्य जनतेचा विश्‍वास बसणे कठीण आहे कारण भाजपची सत्ता गेल्या पंधरा-वीस वर्षांत केंद्रापासून राज्यांपर्यंत अनेक ठिकाणी आली आहे आणि विरोधक जरी भाजप सत्तेत आल्यावर धार्मिक दंगली उसळतील इत्यादी राळ उठवीत असले तरी प्रत्यक्षात तसे घडताना दिसलेले नाही.

थरूर यांचे विधान त्यामुळेच बिनबुडाचे ठरते; कारण गेल्या 70 वर्षांत एवढ्या वेळा तशी परिस्थिती येऊनही भारतातील जनतेने कधीही धार्मिक उन्मादाच्या बाजूने उभे राहण्याचे पसंत केलेले नाही. याचे कारण पुन्हा भारतीय समाजाच्या मानसिकतेत असावे. टोकाच्या भूमिका काही पक्ष किंवा संघटना घेत असतीलही; परंतु समाजाने अशा टोकाच्या भूमिकांना नेहमीच नाकारले आहे. चिथावणीखोर भाषणे करणाऱ्या ओवेसींना मतदारांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. वास्तविक ओवेसी यांची भाषणे जहाल असतात आणि वातावरण पेटवणारी असतात. परंतु त्यांनाही मतदारांनी स्वीकारलेले नाही. कट्टर हिंदुत्वाच्या नावाखाली जेव्हा काही जण गायीला मारल्याच्या संशयावरून दलितांना लक्ष्य करतात तेव्हाही जनता असल्या कृत्यांना नापसंती दर्शविते. बाबरीच्या पतनानंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हादेखील भाजपच्या जागा जरी वाढल्या, तरी भाजप सत्तेत येऊ शकला नव्हता.

सन 2014 च्या निवडणुकांत मोदींनी हिंदुत्वापेक्षा विकास आणि गुजरात मॉडेल यावर भर दिला होता; त्याचा भाजपला स्वबळावर सत्ता मिळण्यात मोठा वाटा होता. भाजपने गेल्या चार वर्षांत घटना बदलाचे सूतोवाचदेखील केलेले नाही. संघाकडून कधी राखीव जागांविषयीचे मत व्यक्त झाले आणि ते मतदारांना निषेधार्ह वाटले तर त्याचे प्रतिबिंब बिहार विधानसभा निवडणुकीत उमटले, तसे अनेकदा विविध प्रसंगी उमटले आहे.

तेव्हा थरूर यांनी हे सर्व लक्षात न घेता नाहकच सनसनाटीपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांना किती समान वागणूक मिळते आणि भारतात अल्पसंख्याकांना कशी वागणूक मिळते याचे सम्यक मूल्यमापन करण्याची तोशीश देखील थरूर यांनी घेतली नाही. समाजात ध्रुवीकरण वाढते आहे याविषयी चिंता व्यक्‍त करून थरूर थांबले असते तर ते कदाचित वस्तुस्थितीदर्शक ठरले असतेही.

पण हिंदू आतंकवाद’ या कॉंग्रेसच्या जुन्या सिद्धांताची री ओढत थरूर यांनी हिंदू पाकिस्तानचा जो बागुलबुवा उभा केला तो कोणालाही मान्य होणार नाही. किंबहुना “हिंदू आतंकवाद’ विधानावरून कॉंग्रेसला कसा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता हा दूरचा इतिहास नाही. थरूर यांनी केलेले विधान विचारहीन आहे यात शंकाच नाही; परंतु त्यांनी आपण भारतीय समाज आणि त्या जनतेची उदारमतवादी मानसिकता यांच्यावर संशय घेत आहोत याचेही भान ठेवले नाही; ना भारताच्या आजवरच्या इतिहासाची नोंद घेण्याचे औचित्य त्यांनी दाखविले.
शशी थरूर यांचे विधान म्हणूनच निषेधार्ह एवढ्या एकाच शब्दाने वर्णिले जाऊ शकते! ते अगदीच अवेळीचे आणि अस्थानीही आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)