20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करणाऱ्या सरकारला कर्जाची गरज कशाला? : जयंत पाटील

कर्जामुळे सरकारची पत घसरली

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलेल्या 500 कोटींच्या बिनव्याजी कर्जावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. सरकारने हिवाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. तिजोरीत पैसे आहेत, म्हणूनच सरकार पुरवणी मागण्यांवर खर्च करायला तयार आहे. मग सरकारला कर्जाची गरज कशासाठी, असा सवाल करीत सरकार एखाद्या संस्थानकडे कोट्यावधी रूपयांचे कर्ज मागते. हे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वार्हता कमी झाल्याचे यावरुन दिसून येते. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

शिर्डी संस्थानाकडून राज्य सरकारने 500 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. एखाद्या संस्थानाकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

सरकारने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध भागामध्ये केलेला खर्चच कमी आहे. आम्ही सत्तेत असताना आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याचा आग्रह धरायचे. आम्ही 11 हजार कोटींपर्यंत निधी सिंचनावर खर्च केला आहे. हे सरकार मात्र 4-5 हजार कोटींवर निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत, असा आरोप त्यांनी केला.

निळवंडे धरणाचे रखडलेले काम पुढे नेण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारच्या तिजोरीत खडाखडाट आहे. त्यामुळे सरकार अडचणीत असून कुणी कर्ज देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या ताब्यातील आणि जेथे संचालक मंडळ नेमले आहे अशा शिर्डी संस्थानाकडून 500 कोटीचे कर्ज घेण्याचा मार्ग अनुसरला आहे. या कर्जामुळे राज्य सरकारची पत कमी झाली आहे, असा आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)