प्रीतम मुंडे यांना कोण टक्कर देणार?

बीड लोकसभा मतदारसंघ 

बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 18 एप्रिलला होणार आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आणि मतदारांची संख्या 20 लाखांहून जास्त आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जवळजवळ दोन लाखांच्या आसपास नव्या मतदारांची वाढ झाली आहे. मतदारसंघात एकूण 2311 मतदान केंद्रे असणार आहेत.

बीड या लोकसभा मतदारसंघात बीड जिल्ह्यातील 228-गेवराई, 229-माजलगाव, 230-बीड, 231-आष्टी, 232-केज (अ.जा.) आणि 233-परळी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र मिळून या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. गेवराई, माजलगाव, आष्टी, बीड, पाटोदा, केज, अंबाजोगाई, धारूर, ओढवणी, शिरूर कासार व परळी वैजनाथ या 11 तालुक्‍यांचा समावेश या मतदारसंघात होतो.

मुस्लीम, बौद्ध, ओबीसी आणि मराठा या समाजाचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. ओबीसीमध्ये बंजारी, माळी, लिंगायत या जाती प्रभावशील असून मुस्लीम समाजाशिवाय अनुसूचित जाती-जमातीतील नवबौद्ध, चर्मकार, मातंग या समाजाची लोकसंख्यादेखील प्रभावी आहे. मुस्लीम समाजाची लोकसंख्या 11.87 टक्‍के तर 3.01 बौद्ध समाजाची लोकसंख्या असून अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत मातंग समाज व चर्मकार समाजासह लोकसंख्या 29.90 टक्‍के आहे. या मतदारसंघात सर्वसाधारण मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींचे प्राबल्य आहे. येथे खुला प्रवर्ग 33.75 टक्‍के, इतर मागास वर्ग 29.58 टक्‍के, अनुसूचित जाती 13.10 टक्‍के, अनुसूचित जमाती 01.12 टक्‍के आणि इतर 22.45 टक्‍के आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. अगदी गावपातळीवरील निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत येथे कॉंग्रेसचा उमेदवार हमखास निवडून येत असे. कॉंग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर यांनी तीन वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. 1952 च्या निवडणुकीत पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंटचे बाबासाहेब परांजपे विजयी झाले होते. त्यानंतर 1957 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे रखमाजी गावडे आणि 1967 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचेच द्वारकादास मंत्री विजयी झाले होते. 1996 च्या निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर सलग तीन वेळा भाजपाचे जयसिंगराव गायकवाड या मतदारसंघातून विजयी झाले. दोन वेळा ते भाजपाच्या तिकिटावर लढले तर 2004 च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवून विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांचा पराभव करीत हा मतदारसंघ भाजपाकडे खेचून आणला.

दुर्दैवाने, गोपीनाथरावांचे आकस्मिक निधन झाले आणि रिक्‍त झालेल्या या जागी त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे पोटनिवडणुकीत विजयी होऊन खासदार बनल्या. यंदाच्या निवडणुकांसाठी भाजपतर्फे त्यांनाच या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. सोनावणे खूप तरुण आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अमरसिंह पंडित यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना धक्‍का बसला आहे. पण सोनावणे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. हे माहीत असेल तर प्रीतम मुंडे यांना आव्हान देण्यासाठी सोनावणे यांची निवड का करण्यात आली, हे सहज लक्षात येते. पण बीड मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा प्रभाव अजून आहे आणि त्यांच्या कन्येनेही त्यांचा वारसा योग्य रितीने पुढे चालवला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या. त्यावेळी मोदी लाट होतीच, शिवाय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाटदेखील होती. शिवाय त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपला उमेदवार त्यावेळी त्यांच्याविरोधात उभा केला नव्हता. थोडक्‍यात त्यावेळी झालेल्या जवळजवळ एकतर्फी निवडणुकीत त्या निवडून आल्या होत्या.

व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या प्रीतम यांना अचानक राजकारणात यावे लागले. त्यांचा पिंड राजकारणाचा नाही असे बोलले जाते. गेल्या पाच वर्षांत खासदार म्हणूनही त्यांनी फारशी चमक दाखवली नाही. वास्तविक पाहता गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व प्रभावी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. पंकजा मुंडे यांचाही जनसंपर्क मोठा आहे. पण प्रीतम मुंडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांत फार मिसळत नाहीत अशी त्यांच्याविषयी तक्रार आहे. त्यांना राजकारणातील छक्केपंजेही अवगत नाहीत. आतापर्यंत पंकजा मुंडे जितक्‍या तडफेने राजकारणात वावरत असतात, तशा प्रीतम मुंडे वावरत नाहीत. पंकजा यांच्या त्या कनिष्ठ भगिनी आहेत. पण त्यांना राजकारणात फारसा रस नाही अशी चर्चा अधूनमधून होत असते. संसदेतही त्या विशेष उपस्थित नसतात. सुरुवातीच्य़ा काळात खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्याबद्दल त्यांना खडसावले होते.

थोडक्‍यात, डॉ. प्रीतम मुंडे राजकारणात फारसा रस नसलेल्या नेत्या आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर त्या काय करतील याबद्दल आता चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी 2019ची निवडणूक त्या लढवणार नाहीत अशी चर्चा होती. पण त्यांच्या बाजूने अद्याप कोणताच खुलासा झालेला नाही. त्यामुळे त्या निवडणूक रिंगणात आहेत, असाच अर्थ राजकीय तज्ज्ञ काढत आहेत.

बीड मतदारसंघात वंजारी मतदारांची संख्या मोठी आहे आणि या समाजाचे गोपीनाथ मुंडे हे निर्विवाद नेते होते. त्यांची गादी त्यांच्या मुलींनी चालवावी अशी अपेक्षा आहे आणि मुंडे भगिनींपैकी बीड मतदारसंघात निवडणूक लढवणे आवश्‍यक आहे अन्यथा ही जागा भाजपला सहज जिंकता येणार नाही. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रीतम मुंडे यांनाही मोठी तयारी करावी लागणार आहे. आपल्या कोषातून बाहेर पडून जनसंपर्क वाढवावा लागणार आहे. या कामी पंकजा मुंडे यांची मदत त्यांना मिळेलच, तरीही आपली स्वत:ची छापही त्यांना पाडावी लागणार आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात खरे तर राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पंडित यांनी तशी प्रचारालाही सुरुवात केली. पण ऐनवेळी सोनवणे यांना तिकीट मिळाले आणि त्यामुळे आता पंडित यांचे कार्यकर्ते प्रचंड संतापलेले आहेत. मध्यंतरी धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री यांनाही निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी कॉंग्रेस उतरवणार असल्याची चर्चा होती. पण आता या सगळ्या चर्चा थंडावल्या आहेत. सोनवणे हे जरी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असले तरी या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावरच असणार आहे आणि त्यांच्या दृष्टीने सोनवणे यांना निवडून आणणे प्रतिष्ठेचे असणार आहे. तसेच प्रितम मुंडे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर त्यांना निवडून आणणे ही पंकजा मुंडे यांची जबाबदारी असणार आहे. म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात खऱ्या आर्थाने निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच असणार आहे आणि दोघांच्याही दृष्टीने ती प्रतिष्ठेची असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)