शिर्डी लोकसभा मतदारसंघात डार्क हॉर्स कोण ठरणार?

प्रा. डी. के. वैद्य
अकोले – शिर्डी लोकसभा मतदारसंघात स्वपक्षीयांनीच स्वपक्षीयांविरुद्ध तलवारी उपसल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तिरंगी लढत तयार झाली असून, अंतिम टप्प्यात या निवडणुकीचा “डार्क हॉर्स’ कोण ठरणार? आतापर्यंतचा हा उमेदवार बदलाचा इतिहास हा मतदारसंघ जपणार? की आहे. त्यालाच संधी देऊन इतिहास घडवणार? याबाबत मतदारसंघात जाणकारांनाही उत्सुकता आहे.

या मतदारसंघात आणखी नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे आतापर्यंत माजीमंत्री बाळासाहेब थोरात – राधाकृष्ण िंवखे असे लढतीचे स्वरूप राहिले होते. मात्र आता शेवटच्या टप्प्यात या लढतीला विखे विरुद्ध शरद पवार असा संघर्ष होणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात बंड करुन विरोधी पक्षाला अनुकूल दान पडेल अशी भूमिका दक्षिण नगर मतदारसंघात घेतली. तर ती निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर आता शिर्डी मतदारसंघातच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध शड्डू ठोकणारी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात गुलाल कुणाच्या अंगावर उधळला जाणार? व कुणाच्या पाठीला माती लागणार? याबाबत संभ्रमाचे व त्याच्या जोडीला कुतूहलाचे वातावरण कायम आहे.

या मतदारसंघात वीस उमेदवार उभे असले तरी अंतिम टप्प्यात ही निवडणूक तिरंगी बनली आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यात सध्या विजयाच्या यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्राप्त परिस्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरणालाही “जान आणणारी उष्णता’ राजकीय वर्तुळात अंतिम टप्प्यात फेकली जात आहे. विद्यमान खासदार तेरा दिवसांचे आहेत. ते काय कामाचे? साडेचार वर्षे त्यांनी काहीच काम केले नाही. म्हणून त्यांच्याच पक्षाचे युवा ग्रामीण कार्यकर्ते त्यांना शिव्या घालताना दिसत आहेत. आतापर्यंत शिवसेनेची ओढ असणाऱ्या या युवा कार्यकर्त्यांनी उघड भाऊसाहेब वाकचौरे यांची पालखी खांद्यावर घेतली असल्याचे सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीच्या मतांची वजावट ही अपक्ष उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना किफायतशीर ठरणार का? की खासदार लोखंडे यांचे विजयाचे गणित बदलणार का ? याबाबत त्यांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात जाण आणली आहे.

नेवासे मतदारसंघात आमदार बाळासाहेब मुरकुटे विरुद्ध माजी आमदार शंकरराव गडाख, श्रीरामपूरमध्ये भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक विरुद्ध विखे पाटील व ससाने गट असा सामना तर कोपरगावात कोल्हे कुटुंबाचे ‘अळीमिळी गुपचिळी’ भूमिका आशुतोष काळेंना पूरक ठरणार की? राहता तालुक्‍यात राधाकृष्ण विखे-पाटील यांना पक्षाविरुद्ध बंड करण्याचा फटका कोणाला बसणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. संगमनेर येथे थोरात गटाविरुद्ध विखे गट असला तरी थोरात गटाचे पारडे येथे जड आहे. अकोले विधानसभा मतदारसंघात आघाडी विरुद्ध युती असा सामना रंगतदार वळणावर येऊन ठेपला असला तरीही येथे विधानसभा लिटमस टेस्ट ठरणार आहे.

खासदार लोखंडे यांनी गेली चार-पाच वर्षे मतदारसंघाची बांधणी केली नाही. असा त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. तर भाजप कार्यकर्ते त्यांच्या समवेत व शिवसेनेचे कार्यकर्ते बंडाची भाषा करून विरोधी गोटात असे विरोधाभासाचे चित्र उमटले आहे. आमदार भाऊसाहेब कांबळे यांची आमदारकीची दहा वर्षे ही फारशी चर्चेत राहिली नाही. विखे थोरात यांच्या छायेखाली ते झाकलेलेच राहिले. शिवाय श्रीरामपूर तालुक्‍यांमध्ये ससाने विखे या प्रभावळीच्या कात्रीत त्यांचा मतदार कसा विचार करणार? किती करणार? असा सध्या चर्चेला जोर आलेला आहे. तर माजी खासदार व अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला जाहीरनामा जाहीर करून आपल्या कामाची पाच वर्षाची खासदारकीची झळाळी ते जनतेपुढे आणण्यासाठी शर्थीची लढाई करीत आहेत.

राखीव असणारा शिर्डी मतदारसंघ 2009 साली चर्चेत आला तो रामदास आठवले यांच्या उमेदवारीमुळे. या मतदारसंघात दोन्ही वेळेला मतदार संघाने विद्यमान खासदारांना संधी परत दिलेली नाही. यावेळेस मतदार नेमके काय करणार? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शेवटच्या टप्प्यात थोरात -विखे असा सामना हा विखे- पवारांच्या नावावर जोडला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार कांबळे यांना किती बळ देते हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)