अर्थमंत्री कोण होणार? गोयल, सिन्हा, स्वामी यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली: नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री कोण होणार याबाबत दलाल स्ट्रीटवर चर्चा चालू आहे. पियुष गोयल, जयंत सिन्हा यांच्या नावाबरोबरच सुब्रमण्यम स्वामी यांचेही नाव या चर्चेत आहे.

54 वर्षीय गोयल यांनी मोदी सरकारमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या खात्यांचा कारभार अतिशय कार्यक्षमपणे हाताळलेला आहे. रेल्वे, कोळसा, ऊर्जा मंत्रालयाचे काम त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात सुधारले. त्याचबरोबर मावळते अर्थमंत्री अरुण जेटली अनेक वेळा अनुपस्थित असताना गोयल यांनी अर्थमंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली.

किंबहुना त्यांनी दोन वेळा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यामुळे शेअरबाजारासाठी गोयल अर्थमंत्री होणे कधीही चांगले असे बोलले जाऊ लागले आहे. त्याचबरोबर या अगोदर नागरी विमान वाहतूक मंत्री पदावर काम केलेले जयंत सिन्हा यांच्या नावाचीही या पदासाठी चर्चा चालू आहे. ते उच्च विभूषित आहेत. त्याचबरोबर त्यांनी इतरही महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

राज्यसभेचे खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामी अर्थतज्ज्ञ आहेत. तसेच स्वामी यांनी याअगोदर अर्थमंत्रालयाच्या आणि रिझर्व्ह बॅंकेच्या कामकाजावर अनेकदा टीका केलेली आहे. जर भारताचा विकासदर सध्याच्या साडेसात टक्‍क्‍यावरून दहा टक्‍क्‍यावर न्यायचा असेल तर आपल्याला अर्थमंत्री करावे असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी अगोदरच केलेले आहे.

मावळते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी, नादारी आणि दिवाळखोरी यंत्रणा यासारखी काही महत्त्वाची कामे केलेली आहेत. मात्र त्यांच्या काळात विकासदर म्हणावा इतका वाढला नाही. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापासून विविध क्षेत्राची उत्पादकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्राची गुंतवणूक कमी झालेली आहे. आता महत्त्वाकांक्षी मोदी सरकारला खरोखरच अर्थव्यवस्था बळकट करून विकासदर वाढवायचा असेल तर या पदावर योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)