विधानसभा निवडणुकीमुळे प्रभावी व्यक्तीच्या निवडीचे संकेत
वाघळवाडी – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे यांचा कार्यकाळ पुढील काही दिवसांमध्ये संपत असल्याने कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे शेतकरी सभासंदाचे लक्ष लागले आहे. बारामतीच्या राजकारणावरही कारखान्याचा प्रभाव असल्याने उपाध्यक्षपदी तेवढ्याच प्रभावी व्यक्तीची निवड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सोमेश्वरच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आठ महिने राहिला आहे; त्यामुळे शेवटच्या टप्प्यात कारखान्याचे सर्वेसर्वा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करतात, याकडे लक्ष लागले आहे. विद्यमान संचालक मंडळामध्ये प्रत्येक गटातील संचालकांना एका वर्षासाठी उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे; त्यानुसार सुरुवातीला प्रथम उत्तम धुमाळ, सिद्धार्थ गीते, लक्ष्मण गोफणे आणि आता लालासाहेब माळशिकारे यांना संधी देण्यात आली. आता, शेवटच्या टप्प्यामध्ये उपाध्यक्षपद कोणाला मिळणार? उपाध्यक्षपदासाठी मुरूम येथील ज्येष्ठ उद्योजक आणि संचालक नामदेवराव शिंगटे यांचे नाव आघाडीवर असल्याचेही समजते. किशोर भोसले, विशाल गायकवाड यांचीही नावे चर्चेत आहेत. शिंगटे यांनी 1985 ते 90 पर्यंत मरून सोसायटीच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे. 1992 ते 1997 सोमेश्वरचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे यांनी राजीनामा दिल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नवीन उपाध्यक्षाची वर्णी लागणार आहे.
विधानसभा लक्षात घेता…
सोमेश्वर कारखान्यातील घडमोडींचा बारामतीच्या राजकारणावरही परिणाम होत असतो. सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कारखाना शेतकरी सभासदांची मते फिरवण्यात यशस्वी ठरणाऱ्या व्यक्तीला उपाध्यक्षपदावर संधी दिली जावू शकते. याकरिता आतापासूनच ठोकताळे बांधले जावू लागले असून संचालक मंडळासह ज्येष्ठ शेतकरी सभासदांशीही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करणार असून त्यानंतरच निवडीचा निर्णय घेणार आहेत.