#विदेशरंग: कोण ही ओक्‍साना शछको? काय आहे तिचे कार्य? 

नित्तेन गोखले 
कागदी वाघांच्या सध्याच्या काळात महिलांसाठी एकपण चांगले कार्य न करता स्वतःच्या वातानुकूलित ऑफिसात बसून स्वतःला स्त्रियांसाठी लढणारे कार्यकर्ते म्हणणारे बरेच लोक आहेत. पण युक्रेनच्या ओक्‍साना शछकोसारखे लोक फार कमी. कोण होती ओक्‍साना शछको? 
जुलै 23, 2018 हा दिवस जगभरातील महिला चळवळ तसेच महिलांच्या अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक काळा दिवस होता. महिलांच्या अधिकारांसाठी सतत लढणाऱ्या, “फेमेन’ संस्थेच्या सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओक्‍साना शछको यांचा मृतदेह त्यांच्या पॅरिस स्थित घरात जुलै 23 रोजी सापडला.
पोलिसांना मृतदेहाजवळ ओक्‍साना यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिट्ठीदेखील मिळाली. ओक्‍साना या 31 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म युक्रेनमधील खमेलियेत्स्की गावात झाला. परंतु शिक्षणासाठी त्या देशाची राजधानी, कीव येथेदेखील काही काळ राहिल्या होत्या. युक्रेनमध्ये जीवाला धोका असल्यामुळे, सन 2013 पासून त्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आश्रय घेतला होता.
युक्रेनचा खरा चेहरा ओक्‍साना शछकोच्या मृत्युमुळे जगासमोर आल्याचे मानले जात आहे. गरिबी, देशातील नोकऱ्यांची कमतरता, तसेच पुरेसे शिक्षण नसल्यामुळे अनेक महिला नाइलाजास्तव वेश्‍यावृत्तीकडे वळतात. वेश्‍याव्यवसायाव्यतिरिक्त देखील युक्रेनसमोर इतर अनेक समस्या आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनबास भागात सरकार समर्थक व रशिया समर्थकांमध्ये गेली काही वर्ष युद्ध सुरू असल्याने नागरिकांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. यामुळे पश्‍चिमी देशातून लग्नासाठी मुलींच्या शोधात येणाऱ्या पुरुषांकडे युक्रेनमधील तरुण मुली आशेच्या नजरेने पाहतात. युद्धस्थिती, गरिबी आणि शोषणापासून सुटका मिळवायला अनेकदा या तरुणी अमेरिका किंवा ब्रिटनमधून येणाऱ्या वयस्कर पुरुषांशी देखील लग्न करायला तयार होतात.
कोणाविरोधात आहे “फेमेन’ची लढाई? 
धार्मिक संस्था असो किंवा मग व्लादीमीर पुतीन यांच्या सारखा मोठा राजकारणी, जगभरात महिलांना वाईट वागणूक देणाऱ्या सर्वांविरोधात “सेमी न्यूड’ चळवळीतून ओक्‍साना शछको यांनी आवाज उठवला. ओक्‍साना व “फेमेन’ संघटना प्रथम चर्चेचा विषय बनले त्यांच्या 2008 दरम्यान युक्रेनमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात केलेल्या आंदोलानांमुळे. त्या काळात, युक्रेन हा देश वेश्‍याव्यवसायासाठीच (सेक्‍स टूरिझम) प्रसिद्ध देश होता. “फेमेन’च्या आंदोलनांमुळे जगभरच्या पर्यटकांना वेश्‍यांच्या शोधात या देशात यायला लाज वाटू लागली, तसेच संयुक्‍त राष्ट्रांच्या मानवी हक्‍क आयोगाचे देखील याकडे लक्ष गेले.
का केला जातो “टॉपलेस-प्रोटेस्ट?’ 
युक्रेनमध्ये “फेमेन’ची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अनेक बलात्कार पीड़ित, तसेच पतीच्या अत्याचारापासून पीडित महिलांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे. सरळरीत्या महिलांवरील अन्यायाविरोधात बोलले तर कोणाला ऐकण्यासाठी वेळ नसतो. याउलट, “टॉपलेस-प्रोटेस्ट’ दरम्यान हेच मुद्दे मांडले तर सरकार आणि माध्यमे याकडे गांभीर्याने पाहतात. हा मुद्दा “फेमेन’ने अनेकवेळा सिद्ध करून दाखविला आहे.
“फेमेन’ या संस्थेच्या संस्थापक अलेक्‍झांड्रा शेवचेंको यांनी नोव्हेंबर 2011 दरम्यान इटलीला जाऊन थेट “व्हॅटिकन सिटी’ येथील सेंट पीटर स्क्वेअर येथे शिरून सरळ चर्चच्या नारीविरोधी धोरणांबाबत निषेध नोंदवला. या घटनेनंतर “फेमेन’ हे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. या संघटनेचे दुसरे मोठे आंदोलन मे 2012 मध्ये युक्रेन देशाची राजधानी कीव येथे झाले. त्या दरम्यान “युरो 2012 सॉकर ट्रॉफी’चे सामने युक्रेन देशात असल्यामुळे मानवी तस्करी करणारे गट सक्रिय झाले होते. “सॉकर ट्रॉफी’च्या कारणाने देशात येणाऱ्या पर्यटकांसाठी वेश्‍या मिळाव्यात, यासाठी अनेक मुलींना वेश्‍याव्यवसायाकडे वळवण्यात येत होते. यातून मिळणारे उत्पन्न मोठे असल्यामुळे सरकार या दलालांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. अशा परिस्थितीत, “फेमेन’च्या सदस्यांनी सरळ कीव येथील एका सार्वजनिक हॉलमध्ये ठेवलेली “युरो 2012 सॉकर ट्रॉफी’ तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ऑगस्ट 2012 मध्ये “लंडन ऑलिंपिक’ स्पर्धेत सहभागी असलेल्या मुस्लीम देशांविरोधात लंडन येथेच आंदोलन करून “शरीयत कायदा कसा महिलांच्या विरोधात वापरला जातो,’ याकडे जगाचे लक्ष आकर्षित केले.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर रशियातील “पुसी रायोट’ व इतर स्त्री मुक्ती संघटनांचा आवाज दाबायचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे, पुतीन यांच्या “हॅनोव्हर फेअर’ या जर्मनी दौऱ्यादरम्यान संधी मिळताच अलेक्‍झांड्रा शेवचेंकोने त्यांच्या समोर जाऊन चेतावणी दिली व रशियन ऑर्थोडॉक्‍स बिशॉप किरिल यांना सुधारायचा सल्ला दिला. या यशामागे ओक्‍साना शछको बरोबरच संघटनेचे सह-संस्थापक अलेक्‍झांड्रा शेवचेंको, इंना शेवचेंको व याना झ्डानोव्हा यांचे देखील प्रयत्न आहेतच.
“सेमी न्यूड’ चळवळीचा विरोध 
जगभरातील अनेक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते “फेमेन’च्या “सेमी न्यूड’ चळवळीचा विरोधदेखील करतात. पण संघटनेसाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. “एखाद्या महिलेची नग्नता पुरुषाचे मनोरंजन करण्यासाठी किंवा लैंगिकरीत्या संतुष्ट करण्यासाठीच का असावी? त्याचा वापर स्त्रियांचे दु:ख, अन्याय व समस्या दर्शविण्याकरीता का केला जाऊ नये?’ असे मत “फेमेन’चे सदस्य अनेकदा पत्रकारांसमोर मांडतात.
देशाचे सरकार, मोठे राजकारणी, धार्मिक संस्था यांच्याविरोधात बोलले की, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच, हे कोणालाही नाकारता न येणारे वास्तव आहे. त्यांना रक्‍ताचा लाल रंग पुनःपुन्हा दाखवला जातो. ओक्‍साना शछको व त्यांच्या सहकाऱ्यांनादेखील गेल्या दहा वर्षांत खूप त्रासाला सामोरे जावे लागले. पोलिसांकडून मारहाण, छेडछाड याव्यतिरिक्त त्यांच्यावर युक्रेनमधील वेगवेगळ्या कोर्टात अनेक खटले चालवण्यात आले. ओक्‍साना यांना 2011 व 2013 मध्ये युक्रेन सुरक्षा दलाच्या लोकांकडून खूप मारहाण करण्यात आली. नशिबाने काही दिवस रुग्णालयात काढल्यानंतर त्या बऱ्या झाल्या. हा हल्ला झाल्यानंतर मात्र ओक्‍सानाने फ्रान्समध्ये जाऊन राहण्याचे ठरवले व तेव्हापासून सगळ्या “फेमेन’च्या कामांपासून त्या दूर झाल्या.
चळवळीमुळे आठवणीत राहील… 
फ्रान्समधील पोलीस ओक्‍सानाच्या मृत्यू मागचे कारण अजून शोधात आहेत. तूर्त तरी तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. ओक्‍साना शछको आज या जगात नसल्या तरी त्या जगभरातील महिलांच्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या सर्वच लोकांच्या मनात सदैव राहील.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)