गुजरातमधील जास्त मतदानाचा लाभ कोणाला

विक्रमी मतदानामुळे राजकीय तर्कवितर्कांना आले उधाण

अहमदाबाद – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 23 एप्रिलला झाले. या तीन टप्प्यांमध्ये 303 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी इतर राज्यांमध्ये 2014 सारखेच मतदान झाले असले तरीही गुजरात मात्र अपवाद ठरले आहे. गुजरातने गेल्या 52 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1967 मध्ये गुजरातमध्ये 63.77 टक्‍के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे हे मतदान 63.60 टक्‍के झाले होते. आता त्यापेक्षाही अधिक मतदान झाले आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

या वाढलेल्या टक्‍क्‍याचा कोणाला फायदा होणार याबाबतचे अंदाज आताच लावणे चुकीचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्‍त केले. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा कल पाहता या मतदानाचा फायदा कॉंग्रेसलाच अधिक होण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. गेल्या निवडणुकीला सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. हा आकडा कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक 75.21 टक्‍के मतदान वलसाडमध्ये झाले आहे. तर सौराष्ट्र आणि अमरेलीमध्ये कमी म्हणजेच 55.75 टक्‍के मतदान झाले आहे. हा परिसर पाण्याचा प्रश्‍न आणि शेतकऱ्यांमधील असंतोषामुळे धगधगत आहे.

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. बारदोलीमध्ये 73.57 टक्‍के, यानंतर छोटा नागपूर 73.44 आणि भरुचमध्ये 73.21 टक्‍के मतदान झाले. वलसाडसह हा भाग आदिवासी बहुल आहे. राजकीय विश्‍लेषकांनी सांगितले की, मतदानाचा वाढलेला टक्‍का हा भाजपाच्या पारड्यात पडला असे म्हणता येणार नाही. मात्र, जर हे मतदान शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढले असेल तर त्याचा फायदा कॉंग्रेसला होण्याची शक्‍यता आहे. आदिवासी भागात झालेले मतदान हे बदलाचे संकेत देते. मात्र, आताच अंदाज लावणे कठीण जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)