कुणी देता का पार्किंग ?

लवकरच आणखी 125 ई-बसेस होणार पीएमपी ताफ्यात दाखल  
नवीन बसेसला आगारात कमी पडतेय जागा

पार्किंग अभावी बसेसचे नुकसान होण्याची भिती

नेहरुनगर, भोसरी व निगडी येथील तीनही पीएमपीच्या आगारात पार्किंगची जागा कमी असल्याने गाड्या आगाराबाहेर काढण्यासाठी त्रास होत आहे. व्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंग नसल्यास बसला नुकसान होण्याची भीती देखील व्यक्‍त करण्यात येत आहे.

पिंपरी  – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महमंडळाकडून (पीएमपी) पिंपरी-चिंचवड शहरातील “बीआरटी’ला गती देण्यासाठी 125 नव्या सीएनजी आणि ई-बसेस दाखल होणार आहे. त्यापैकी 33 ई-बसेस निगडीच्या पीएमपी आगारात दाखल झाल्या आहेत. यामुळे बसेसची कमतरता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल मात्र, नवीन आलेल्या बससेच्या “पार्किंगला’ जागा अपुरी पडत असल्याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहरातील तीनही आगारात पार्किंगसाठी जागा कमी असल्याने आता पार्किंगसाठी जागेचा शोध सुरू झाला आहे. यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून महापालिका आणि प्राधिकरणाकडे आरक्षित जागा मिळविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया कासवगतीने सुरु असल्याने पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पीएमपी बसेसची सातत्याने भासणारी कमतरता दूर करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून “पीएमपी’च्या ताफ्यात नव्या बसेस येणार असल्याचे सांगण्यात येत होते. बस येणार हे माहीत असताना बस लावायच्या कुठे यावर मात्र गांभिर्याने विचार झाल्याचे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत नाही. 125 ई-बसेस पैकी 33 नवीन ई-बसेस बीआरटी मार्गासाठी आल्या आहेत. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून उर्वरीत बसेस साधारण महिनाभरात “पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात काळेवाडी-देहू आळंदी हा “बीआरटी’ मार्ग देखील बसेसच्या प्रतिक्षेत आहे. नवीन आलेल्या बसेस या मार्गात धावतील. सध्या 25 “ई-बसेस’ निगडी येथील आगारात पार्क करण्यात येत आहेत. तर, नवीन आलेल्या 33 बसेस सुद्धा येथेच पार्क करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात तीन आगार आहेत. त्यापैकी निगडी आगारात सर्वाधिक जागा असल्याने येथे नवीन वाहने ठेवण्यात येत आहेत.

नेहरुनगर आणि भोसरी येथे बस “पार्किंग’ची जागा अपुरी आहे. परिणामी, तेथे नादुरुस्त आणि इतर मार्गातील बसेस थांबवल्या जातात. त्यामुळे नवीन जागेचा विचार प्रशासनाला करावा लागणार आहे. यासाठी “पीएमपी’ला नवीन जागा देण्याबाबत प्राधिकरण आणि महापालिकेकडे प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या निगडी येथील आगारात “पार्किंग’ करण्यात येत आहे. तीन जागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून “पार्किंग’चा प्रश्‍न सुटणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)