पांढरे विष

डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये 

सिकाला आहारातील साखर व मीठ या दोन पांढऱ्या विषांबद्दल बरीच माहिती मिळाली. साखर व मीठाचे आहारातील आवश्‍यक प्रमाण, अतिरिक्त वापराचे आरोग्यावरील दुष्परिणाम, जास्तीचे प्रमाण कमी करण्यासाठी टीप्स, मीठ – साखरेला पर्यायी पदार्थ याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली. आता आहारातील इतर पांढऱ्या विषांबद्दल आम्ही बोलायला लागलो.
साखर, मिठानंतर आहारातील पुढचे पांढरे विष म्हणजे मैदा. तुझ्या आणि इतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा – बिस्कीटाने म्हणजे मैद्याने होते. अनेक जण चहाबरोबर खारी, टोस्ट, क्रॅकर्स, क्रीमरोल, केक, शंकरपाळी देखील घेतात. शिवाय ब्रेड हा अनेकांच्या नाश्‍त्याचा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांच्या आहारात देखील नूडल्स, पास्ता, मॅकरोनीने शिरकाव केला आहे. या सगळ्या पदार्थांमध्ये मैदाच असतो. हे पदार्थ आहारात घेणे मुळीच चांगले नाही. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी तर नाहीच नाही. मी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

का पण? किती सोयीचे आहेत हे सगळे पदार्थ? रसिकाने कळीचा मुद्दा मांडला.
खरंय तुझं. पाण्यात दोन मिनिटे उकळल्या की नूडल्स रेडी! पाकीट फोडले की बेकरीतील पदार्थ खाण्यास तयार! पण संतुलित आहार घेणे इतके सोपे नाही!! मला सांग, आपण 4 दिवसांची शिळी पोळी खातो का काही करायला लागू नये म्हणून?? मी रागावूनच विचारले.
नाही! रसिका उत्तरली.

मग कित्येक दिवसांपूर्वी, अगदी काही महिन्यांपूर्वी तयार केलेली बिस्कीटे कशी चवी-चवीने खातो? बिस्किटाचा पुडा फोडताना त्यावरची मॅन्युफॅक्‍चरिंग डेट पाहतेस की नाही? मी.
नाही गं… असा विचार कधी करतच नाही मी! रसिका ओशाळली.

हे पदार्थ टिकण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रक्रिया केल्या असतात. या प्रक्रियांदरम्यान त्यातील सर्व सत्वे निघून जातात. आता मैद्याचेच बघ ना. गव्हाच्या पीठातील सर्व फायबर्स (गव्हावरील आवरण) काढून टाकले की रहातो तो मैदा. या आवरणाबरोबरच त्यातील जीवनसत्वे देखील निघून जातात. फायबर्स काढून टाकल्याने मैदयाचे सहजगत्या साखरेत रुपांतर होऊन रक्तातील साखर चटकन वाढते, रक्तातील व शरीरातील चरबी वाढते. शिवाय मैद्याचे पदार्थ खाल्यानंतर थोड्याच वेळात परत भूक लागते. मी सांगितले.

खरंय तुझं. रसिकाला माझे म्हणणे पटले.
आणि हीच गत पांढऱ्या भाताची (पॉलिश केलेल्या तांदूळाची)! – आहारातील पुढचे पांढरे विष! मी रसिकाला पुढचा क्‍लू दिला!

हो की! पॉलिश करताना तांदळाचे सगळे आवरण काढून टाकले जाते. त्यामुळेच तर भात पांढरा शुभ्र होतो! रसिका स्वतःच म्हणाली.
बरोबर! तो शिजतोही पटकन आणि खातानाही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत! याउलट हातसडीचा / बिनापॉलिशचा तांदूळ शिजायला वेळ लागतो, तो व्यवस्थित चावून खायला लागतो. पण हे जास्त कष्टाचे काम लोकांना आवडत नाही व सगळे बिनापॉलिशच्या तांदळाला नावे ठेवतात. मी पुढे म्हणाले.

अगं हो. मी पण एकदा वापरला होता पण घरात कोणालाच आवडला नाही. रसिकाने कबुली दिली.
एक साधा मंत्र लक्षात ठेव – कोणताही धान्यापासून बनलेला पदार्थ जितका लवकर शिजेल आणि जितका पटकन (न चावताही) खाता येईल तितके त्यातील फायबर्सचे प्रमाण कमी! अशा पदार्थांचा वजन कमी करायला काही उपयोग नाही. अजून एक उदाहरण घेऊ. तू सकाळी बारीक रव्याचा उपमा करत असशील. तोही दोन मिनिटात शिजत असेल. मऊ, लुसलुशीत उपमा खायलाही अगदी सोप्पा! म्हणजेच वजन कमी करायला काही कामाचा नाही. कारण उपम्याचा बारीक रवा म्हणजे जवळपास मैद्यासारखाच. पण हाच उपमा जर तू दलियाचा केलास तर? मी विचारले.
हं, मग तो शिजायला आणि खायलाही वेळ लागेल. म्हणजेच त्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असणार. बरोबर? रसिकाने विचारले.

परफेक्‍ट! मी रसिकाला शाबासकी दिली. असे लहान लहान बदल करायचे आहारात. येतंय का लक्षात?मी.
हो. म्हणजे मसाला ओटस आणि पोहे देखील चालणार नाहीत? रसिका आता एकएक पदार्थ पांढऱ्या विषांच्या पट्टीवर मोजून पहात होती.

व्हाईट ओट्‌सच्या नावातच व्हाईट आहे! ते दोन मिनिटातच शिजतात. खरंतर ओट्‌स तब्येतीसाठी चांगले. पण व्हाईट ओट्‌सपेक्षा रोल्ड ओट्‌स अथवा स्टील कट ओट्‌स घ्यावेत. अर्थातच त्यांना शिजायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे हल्ली पांढऱ्या पोह्यांच्या जागी बिनपॉलिशच्या तांदळापासून तयार केलेले मब्राऊन पोहेफ मिळतात. ते वापरता येतील. मी तिला पर्याय सुचवले.

समजले आता नीट. बरं, अजून कोणती पांढरी विषे आपल्या आहारात असतात? रसिकाने उत्सुकतेने विचारले.
उपवास करतेस का तू? मी प्रतिप्रश्न केला.

हो. सोमवार, चतुर्थी आणि एकादशी. रसिका.
काय खातेस उपवासाला? मी हसत विचारले.
साबुदाण्याची खिचडी! रसिका पटकन म्हणाली. ओ हो! म्हणजे साबुदाणा पुढचे पांढरे विष की काय? रसिकाची ट्यूब पेटली!

येस! उपवासाच्या दिवशीचे फेवरेट पदार्थ – साबुदाणा आणि बटाटा! मी उत्तर दिले.
मग उपवास करायचाच नाही की काय? रसिकाने विचारले.
त्याबद्दल पुढे सविस्तर बोलू केव्हातरी. पण सध्या हे लक्षात ठेव की साबुदाणा, बटाटा म्हणजे केवळ स्टार्च! पोळी आणि बटाट्याची भाजी म्हणजे पोळी-भाजी नाहीच! त्याला मपोळी-पोळीफ असेच म्हणावे लागेल! मी गमतीने म्हणाले. साबुदाणा, बटाट्यामध्ये तंतूमय पदार्थ नसतातच शिवाय त्यांपासून बनविलेल्या पदार्थांमध्ये भरपूर तूप, दाण्याचे कूट असतेच! हे सगळे खाऊन वजन कमी कसे होईल? मी म्हणाले.
हो. बरोबर आहे. रसिका.

आता तुपाचा विषय आलाच आहे तर आपण पुढच्या पांढऱ्या विषांबद्दल बोलूया. आपल्या आहारातील पुढची पांढरी विषे म्हणजे तुपाचे भाईबंद – डालडा, क्रीम, आणि विकतचे बटर. मी म्हणाले.
म्हणजे घरचे लोणी-तूप चालेल? रसिकाच्या मनातला प्रश्न मला माहीत होता!
हो. घरी गाईच्या दूधापासून केलेले लोणी आणि त्यापासून कढवलेले तूप दिवसभरात एखादा चमचा चालेल. मी.
गाईच्या दुधापासून अगदीच कमी लोणी-तूप मिळते रसिका. बरोबर आहे. तेवढेच पुरले पाहिजे सगळ्यांना! मी हसून म्हणाले.

बटर का नको? सुजयला तर बटर खूप आवडते. रसिका.
तूच सांग बरं! बटरमध्ये आणखी एक पांढरे विष असते ना? मी तिला विचार करायला प्रवृत्त केले.
अरे हो की! मीठ!! रसिका म्हणाली.

हं.. असे एकापेक्षा जास्त पांढरी विषे असणारे अनेक पदार्थ आपण खातो. आता मला सांग बरं बिस्कीटात कोणकोणती पांढरी विषे असतात? मी रसिकाची उजळणी घ्यायचे ठरवले!
मैदा, साखर, डालडा आणि सोडा! रसिकाने थोडा विचार करून अचूक उत्तर दिले.
आणि चिप्स मध्ये? मी.
बटाटा, मीठ, साखर रसिका.
वडा-पाव किंवा समोसा यामध्ये? मी.
बटाटा, मीठ, मैदा, सोडा रसिका.
सॉफ्ट ड्रिंक्‍समध्ये? मी.
साखर आणि सोडा रसिका.
अगदी बरोबर! आता लक्षात आले ना तुझ्या की आपण अजाणता अनेक पांढऱ्या विषांचे कॉकटेल रिचवत असतो!! तू पाकिटबंद पदार्थांच्या वेष्टनावरची फूड लेबल्स वाचत जा. तुझ्या लक्षात येईल की या पॅकबंद पदार्थांमध्ये पांढऱ्या विषांचा सढळहस्ते वापर केलेला असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर 1 ग्लास सॉफ्ट ड्रिंकमध्ये जवळपास 8 टीस्पून साखर असते मी!

अरे बापरे! काय काय ढकलतो आपण आपल्या पोटात!! रसिका डोळे विस्फारून म्हणाली.
आता मी नक्की या सगळ्या पांढऱ्या विषांपासून लांब रहाण्याचा प्रयत्न करीन. उपवासाचे तेवढे सांग बाई. उपवासाला काय खात जाऊ की निर्जळीच करु? रसिकाने फारच मनावर घेतले होते!
हो हो… सांगते सविस्तर. मी हसून म्हणाले.
(क्रमश:)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)