दुसरे क्रेडिट कार्ड घेताना…

सध्या क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याची बॅंकांत स्पर्धा लागली आहे. यातूनच आपल्याला क्रेडिट कार्ड घेण्यासंबंधी दररोज तीन चार फोन तरी येतात. बॅंका आपल्याला कार्डवरील अनेक ऑफरची माहिती देतात. जर आपल्याकडे अगोदरच क्रेडिट कार्ड असेल तर आणखी फायदेशीर ठरणाऱ्या दुसऱ्या कार्डची देखील माहिती सांगतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, एकाच बॅंकेतून दोन कार्ड घेण्याऐवजी वेगवेगळा लाभ देणाऱ्या दुसऱ्या बॅंकेचे क्रेडिट कार्ड घेणे हिताचे ठरू शकते. सध्या देशात 4 कोटी 42 लाख क्रेडिट कार्ड सक्रिय आहेत. तसेच 95 कोटी 82 लाख डेबिट कार्डधारक आहेत.

ऑफरकडे लक्ष द्या
बहुतांश बॅंका वेगवेगळ्या ऑफरचे क्रेडिट कार्ड देतात. त्यात कॅशबॅक, रिवॉर्ड पाईंट, खरेदीवर सवलत, प्रवासावर पाच ते दहा टक्के सवलत यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. काही वेळेस डायनिंग कार्डची देखील ऑफर असते. त्यात विशेष श्रेणीतील हॉटेल, रेस्टॉरंट येथे रूम बुक केल्यास जेवणावर सवलत मिळते. याशिवाय झिरो फ्युएल सरचार्ज आणि फ्लाइट अपग्रेड किंवा प्रिव्हिलेज कार्ड यासारखे अनेक ऑफर बॅंका देतात.

खरेदीवर नियंत्रण गरजेचे
जर खरेदीवर नियंत्रण राहात नसेल तर अधिक क्रेडिट कार्ड असणे देखील चुकीचे आहे. वेळेवर बिल न भरणे किंवा मिनिमम बिल न भरणे यामुळे आपला क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. तसेच बॅंकेच्या प्रोफाइलसाठी देखील नुकसानकारक आहे. म्हणूनच फ्युएल कार्ड, ट्रॅव्हल कार्ड किंवा हॉटेल बुकिंगवर ऑफर देणारे वेगळे कार्ड घेणे फायद्याचे ठरू शकते.

पर्याय म्हणून वापर
आपले पहिले क्रेडिट कार्ड हे अनेक कारणांमुळे काम करत नसेल तर दुसरे कार्ड उपयुक्त ठरते. अनेक प्रकारचे प्रीमियम किंवा परकी कार्ड हे काही ठिकाणी मान्य केले जात नाही. ग्रामीण भागात किंवा जिल्हा पातळीवर अशा कार्डचा वापर करताना अडचण येते. अशोवळी दुसरे कार्ड हा चांगला पर्याय ठरू शकतो.

वेळेवर बिल भरा
आपल्याकडे दोन किंवा तीन कार्ड असेल आणि त्याचे बिल वेळेवर भरत असाल तर त्यामधून आपला क्रेडिट स्कोर सुधारतो. कर्जफेडीची क्षमता पाहून आपल्याला कमी व्याजदरात कर्ज देण्याची ऑफर देखील बॅंक आपल्याला देते.

सहा गोष्टी लक्षात ठेवा
– जर आपण एकाच बॅंकेतून दुसरे कार्ड घेत असाल तर या कार्डमध्ये पूर्वीप्रमाणेच काही उणिवा तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी.
– जर पहिल्या कार्डचे पेमेंट नियमित होत नसेल तर दुसरे कार्ड घेणे नुकसानकारक ठरू शकते.
– वेगवेगळी पेमेंट सायकल आणि बिलाची तारीख असलेल्या क्रेडिट कार्डची निवड करणे उपयुक्त ठरते.
– तीन ते चारपेक्षा अधिक कार्ड ठेऊ नये. कारण आऊटस्टॅंडिंग बॅलन्स कमी होतो आणि क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो.
– प्रीमियम कार्डची निवड करताना त्याचा चांगला वापर होईल, याची खातरजमा करून घ्यावी.
– क्रेडिट कार्डची निवडताना दरवर्षी आकारल्या जाणाऱ्या किमान शुल्काची माहिती जाणून घ्यावी.

– अपर्णा देवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)