गृहकर्जाचा मार्ग सुकर करताना (भाग-२)

स्वत:च्या हक्काचे घर असावे, अशी सर्वसाधारण भावना असते. विशेषत: महानगरात, नोकरीच्या ठिकाणी भाड्याने राहण्यापेक्षा स्वत:च घर खरेदी करून शाश्‍वत गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. अर्थात या वेळी घराच्या वाढत्या किमती देखील लक्षात घ्याव्या लागतात.

गृहकर्जाचा मार्ग सुकर करताना (भाग-१)

गृहकर्ज किती घ्यावे
जर आपल्याकडे संपूर्ण कागदपत्रे असतील तर बॅंक किंवा फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेण्यास काहीही अडचणी येत नाहीत. अर्थात आपल्याला कमी व्याजदरात गृहकर्ज कोणत्या बॅंकेकडून मिळू शकते, याचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वोत्तम पर्याय शोधण्यासाठी विविध वित्तीय संस्थांकडून गृहकर्जावर दिले जाणाऱ्या व्याजदराची माहिती, कालावधी, ऑफर याचे अध्ययन करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बॅंकांच्या प्रस्तावाची तुलना करणारी यादी तयार करायला हवी. बॅंकिंग नियमानुसार एक वेतनदार कर्मचारी हा निव्वळ हाती पडणाऱ्या वेतनाच्या आधारावर 60 पट गृहकर्ज मिळवण्यास पात्र असतो. अर्थात नोकरदार मंडळी ही गृहकर्जासाठी नेहमीच पात्र असते.

एवढेच नाही तर बॅंक प्रोबेशनरीच्या काळातही सरकारी कर्मचाऱ्यांना गृहकर्ज देण्यासाठी तयार असतात. खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी एक वर्षाचा अनुभव महत्त्वाचा मानला जातो. लोन टू इन्कम किंवा डेट टू इन्कम म्हणजे कोणतेही कर्ज हे उत्पन्नाच्या प्रमाणात मिळत असते. एखादा गृहकर्जदार दैनंदिन गरजा भागवून कितपत हप्ता भरू शकतो, याचे आकलन केल्यानंतर बॅंक गृहकर्जाचा प्रस्ताव किंवा रक्कम मंजूर करते. कमी कर्ज हे चांगल्या उत्पन्नाचे प्रतिक मानले जाते आणि त्याचबरोबर कर्जदात्याकडून वेळेवर परतफेडीची हमी देखील बॅंकांना मिळते. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय, उत्पन्नाचे साधन, जबाबदारी, नोकरीची हमी, मागील कर्जाचा इतिहास, कालावधी, व्याजदर आदी गोष्टी अवलंबून असतात. गृहकर्जात अनेक सवलती देखील असतात. कॉर्पोरेट सवलत, महिलांसाठी विशेष सूट, सरकारी किंवा माजी सैनिकांसाठी सवलत आदींची चौकशी करून आपण गृहकर्ज घेताना अनेक लाभ पदरात पाडून घेऊ शकतो.

सॅलरी स्लिपकडे दोनदा लक्ष द्या
जेव्हा आपण गृहकर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बॅंकेत आपल्याला किमान तीन महिन्यांची सॅलरी स्लिप सादर करावी लागते. ही सॅलरी स्लिप कर्ज परतफेडीची क्षमता सांगण्याचे काम करते. त्यावरच आपल्याला कितपत गृहकर्ज मंजूर करायचे की नाही, हे निश्‍चित होते. अर्थात सॅलरी स्लिपमधील काही गोष्टी गृहकर्जासाठी गृहित धरल्या जात नाहीत. उदा. मेडिकल रिईम्बर्समेंट, एलटीए सारखे भत्ते हे निव्वळ उत्पन्नाचा भाग असले तरी बॅंकेकडून कर्जाचे वितरण करताना या भत्त्यास गृहित धरले जात नाही. कारण हे भत्ते आपण केलेल्या खर्चाचाच एक भाग असतात.

क्षमतेनुसार गृहकर्ज घ्या
प्रत्येक बॅंक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी नागरिकांना गरजेनुसार विशेष गृहकर्ज म्हणजेच कस्टमाईज कर्ज सादर करत असते. जर बॅंकेचे आपले चांगले संबंध असतील तर काम आणखीच सोपे होते. आजकाल बॅंका तसेच बिल्डर मंडळींनी गृहकर्ज प्रक्रिया आणखीच सोपी केली आहे.

– सुभाष वैद्य 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)