कोणते शिंदे कुणाला वरचढ ठरणार?

कोरेगाव-खटाव मतदारसंघात उत्सुकता
मयूर सोनावणे

सातारा – नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोरेगाव तालुक्‍यात भाजपने मुसंडी मारली खरी. मात्र, भाजपची ही मुसंडी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा मानली जाऊ लागली आहे. याशिवाय भाजपचे नेते महेश शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये कोरेगाव-खटाव या विधानसभा मतदार संघांत पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे सुरु केल्याने त्यांच्याविषयी जनतेतून लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दोन शिंदे समोरसमारे असणार. मात्र, कोणते शिंदे कुणाला वरचढ ठरणार हे आगामी काळच ठरवणार आहे.

मतदार संघांच्या पुनर्रचनेनंतर सातारा-जावली हा एकच मतदार संघ झाला. त्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी कोरेगाव मतदार संघात स्थलांतरित व्हावे लागले. कोरेगाव-खटावच्या जनतेनेही त्यांच्या बाजूने कौल दिला आणि त्यांना मतदार संघाचे प्रतिनिधीत्व बहाल केले. सुरुवातीला तालुक्‍यात विकासकामांचा झंजावत निर्माण करणाऱ्या आमदार शिंदे यांना पुढे त्यात सातत्य ठेवता आले नाही आणि मतदार संघात म्हणावी तितकी कामे झाली नसल्याने जनतेत त्यांच्याविषयी सध्या रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचा फायदा घेत विरोधकांनी आपली मोट बांधण्यास सुरुवात केली असून “उपरा उमेदवार आणखी किती दिवस?’ असा प्रचार सुरु करत “आपला तो आपला’ चा नारा देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच यापूर्वी फारसं चर्चेत नसणारे मात्र तरुण अन्‌ उमदे नेतृत्व म्हणून भाजपचे नेते महेश शिंदे सध्या मतदार संघात जणूकाही पायाला भिंगरी बांधून फिरत असल्याने आपला माणूस म्हणून त्यांच्याविषयी जनतेत वाढलेली लोकप्रियता लपून राहिलेली नाही. तसेच राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पदही शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे यांनाच दिल्यामुळे पक्षात दुसरी कर्तृत्ववान पोरं नाहीत का? अशी चर्चा मध्यंतरी सुरु होती. या चर्चेतूनच अनेक इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर पसरला असून आगामी निवडणुकीत या नाराजांचा राष्ट्रवादीला नक्कीच फटका बसणार असल्याची चर्चा कोरेगाव तालुक्‍यात सुरु आहे.

सध्या पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात होती. मात्र या रंगीत तालमीत भाजपने राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष शशिकांत शिंदे यांना धोबीपछाड केल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमधील यश हे भाजपसाठी विशेषत: महेश शिंदे यांना मिळालेले मोठे प्रोत्साहनच मानले जात आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्‍यातील आगामी विधानसभेची निवडणूक ही मोठी रंगतदार होणार असल्याची चिन्हे आत्तापासूनच निर्माण झाली आहेत.

“लोहा लोहे को काटता है’

हिंदीमध्ये एक म्हण आहे, ती म्हणजे “लोहा लोहे को काटता है’. या म्हणीप्रमाणेच कोरेगाव-खटाव या मतदार संघातील परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. बाहेरच्या मतदार संघातून येऊनही सलग दोन टर्म काढणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध यावेळी शिंदे घराण्यातील असणारेच महेश शिंदे उभे ठाकले आहेत. त्यामुळे महेश शिंदे हे शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदार संघातून हद्दपार करणार का? हे आगामी काळच ठरवणार असला तरी “लोहा लोहे को काटता है’ म्हणीप्रमाणे लढत पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)