माढ्यात कोणता विधानसभा मतदारसंघ ठरणार निर्णायक?

सातारा – सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जोरदार लढत झाली. दोन्ही उमेदवारांच्या बाजूने प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ राहताना दिसून येत आहेत. अशा वेळी विजयासाठी नेमका कोणता विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात फलटण, माण-खटाव, माळशिरस, करमाळा, माढा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीतील दोन्ही उमेदवार विरूध्द दिशेच्या मतदारसंघातील आहेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटणचे तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे माढ्याचे आहेत. त्यामुळे साहजिकच स्थानिक उमेदवार म्हणून दोन्ही उमेदवारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍क्‍य मिळण्याची शक्‍यता आहे. विशेषत: संजय शिंदे यांचे बंधू बबनदादा शिंदे माढ्याचे आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक तब्बल 2 लाख 25 हजार 708 इतके मतदान माढा विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तर त्यापाठोपाठ निंबाळकर यांच्या फलटण विधानसभा मतदारसंघात 2 लाख 9 हजार 803 इतके मतदान झाले आहे.

दोन्ही उमेदवारांसाठी या जमेच्या बाजू आहेत. तर संजयमामा शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर करमाळ्यातून लढविली होती. त्या मतदारसंघात संजय शिंदे निसटत्या फरकाने पराभूत झाले असले तरी 58 हजार 377 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्‍मी बागल यांना 60 हजार 417 मते मिळाली होती. त्या निवडणूकीत शिवसेनेचे नारायणअण्णा पाटील 60 हजार 674 मते प्राप्त करत केवळ 57 मतांनी विजयी झाले होते.

आताच्या लोकसभा निवडणूकीत करमाळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 88 हजार 999 इतके मतदान झाले आहे. संजय शिंदे यांना रश्‍मी बागल यांची तर निंबाळकर यांना आ. नारायणअण्णा पाटील यांची मदत झाली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात 2 लाख 7 हजार 561 मतदान झाले आहे. या मतदारसंघात मोहिते-पाटील यांनी निंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्‍क्‍य देण्याचा शब्द दिला आहे. तर शिंदे यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांच्या तुलनेत राष्ट्रवादीचा प्रबळ नेता प्राप्त होऊ शकला नाही. त्याचबरोबर अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. माण विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 93 हजार 159 इतके मतदान झाले आहे.

माळशिरस प्रमाणेच विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फौज निंबाळकर यांच्या पाठीशी उभी केली. एवढेच नव्हे तर, आ. गोरे यांचे विरोधक आणि बंधू शेखर गोरे यांनीदेखील निंबाळकर यांना पाठिंबा दिला. त्या तुलनेत शिंदे यांच्या पाठीशी प्रभाकर देशमुख एवढाच एक राष्ट्रवादीचा नेता आणि कार्यकर्ते उभे राहताना दिसून आले. त्यापाठोपाठ सांगोला विधानसभा मतदारसंघात 1 लाख 85 हजार 818 मतदान झाले आहे. या मतदारसंघात शिंदे यांच्या पाठीशी विद्यमान आमदार गणपतराव देशमुख तर निंबाळकर यांच्या पाठीशी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ताकद उभा केली. एकूण विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान आणि राजकीय स्थिती पाहता नेमका कोणता विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)